Mohammed Shami Heel Surgery Successful : विश्वचषक २०२३ पासून घोट्याच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या स्टार गोलंदाजाने स्वत: सोशल मीडियावर फोटो शेअर करून याची माहिती दिली आहे. या दुखापतीमुळे तो आयपीएल २०२४ च्या हंगामात सहभागी होणार नसल्याची बातमी अलीकडेच समोर आली होती. शमी देखील घोट्याच्या दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या चालू कसोटी मालिकेतून बाहेर होता. मात्र, आता त्याला मैदानात परतण्यास वेळ लागेल.

मंगळवारी मोहम्मद शमीने लंडनमध्ये टाचेवरी आपली शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची सांगितले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर काही फोटो शेअर करताना शमीने लिहिले, ‘माझ्या अकिलीस टेंडन टाचेची नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे! बरे होण्यासाठी थोडा वेळ लागेल, पण मी माझ्या पायावर उभा राहण्यास उत्सुक आहे.” शमी २०२३ च्या विश्वचषक अंतिम सामन्यापासून मैदानापासून दूर आहे. पहिले इंजेक्शन घेतल्यावर तो तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून शस्त्रक्रिया करण्यात आली.

विश्वचषकात केली होती चांगली कामगिरी –

गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२३ मध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकात मोहम्मद शमीने शानदार गोलंदाजी केली होती. त्याने दमदार प्रदर्शन करताना स्पर्धेत सर्वाधिक २४ बळी घेतले. त्याच्या या कामगिरीमुळे भारताने मायदेशात खेळल्या गेलेल्या या विश्वचषकात अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र, अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून संघाला पराभवाचा सामना करावा लागला. अलीकडेच मोहम्मद शमीलाही अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याचवेळी आता तो लवकरात लवकर मैदानात परतेल, अशी आशा शमीसह चाहत्यांना आहे.

हेही वाचा – Ranji Trophy 2024 : हनुमा विहारीच्या प्रकरणाला नवं वळण, आंध्र क्रिकेट असोसिएशनने घेतला चौकशीचा निर्णय

गुजरात टायटन्सला बसला मोठा धक्का –

मोहम्मद शमी आयपीएल २०२४ मध्ये न खेळणे हा गुजरात टायटन्स संघासाठी निश्चितच मोठा धक्का आहे. यावेळी आयपीएलमध्ये शुबमन गिल गुजरात टायटन्सचे कर्णधारपद सांभाळणार आहे. गेल्या मोसमात गुजरातचा संघ स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी ठरला होता, मात्र चेन्नई सुपर किंग्जकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. चेन्नई सुपर किंग्जने गुजरातला हरवून पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते.