भारतीय संघात निवड न झालेल्या वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने रणजी करंडक स्पर्धेत दमदार कामगिरी करत निवडसमितीला प्रत्युत्तर दिलं. शमीच्या फिटनेससंदर्भात साशंकता व्यक्त करण्यात येत होती. मात्र पाच विकेट्स पटकावत शमीने बंगालच्या गुजरातविरुद्धच्या लढतीत निर्णायक भूमिका बजावली.

शमीने दुसऱ्या डावात ३८ धावांत ५ विकेट्स घेतल्या. पहिल्या डावात शमीने ३ विकेट्स घेतल्या होत्या. सामन्यात ८ विकेट्स घेत शमीने भारतीय संघात पुनरागमनच्या दृष्टीने दमदार पाऊल टाकलं. बंगालने गुजरातला १४१ धावांनी नमवलं.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात मोहम्मद शमीला स्थान दिलं गेलं नव्हतं. यामागचं कारण विचारलं असता, निवडसमितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी सांगितलं होतं की, ‘मोहम्मद शमी पूर्णपणे फिट नसल्यामुळे त्याला संघात स्थान दिलं गेलेलं नाही. शमीसंदर्भात माझ्याकडे अपडेट नाही. गेल्या २-३ वर्षात तो फार क्रिकेट खेळला नाहीये. त्याने बंगालसाठी एक सामना आणि दुलीप ट्रॉफीचा सामना खेळला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जबाबदाऱ्या आणि दडपण जास्त असतं. त्याने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये आणखी थोडे सामने खेळायला हवेत’.

यावर शमीनेही उत्तर दिलं होतं. संघात निवड करायची होती तर अपडेट त्यांनी घ्यायला हवं होतं. रणजी करंडक स्पर्धेत मी चार दिवसांचे सामने खेळू शकतो आहे तर पाच दिवसांचा कसोटी सामना खेळू शकणार नाही का? असा सवाल शमीने केला होता. दुखापतीमुळे शमीला प्रदीर्घ काळ भारतीय संघाबाहेर राहावं लागलं आहे. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणं हे माझं काम आहे. ते मी करतो आहे. माझा फिटनेस मी सिद्ध केला आहे.

इंग्लंड दौऱ्यासाठीही शमीच्या नावाचा विचार करण्यात आला नव्हता. त्यावेळी आगरकर म्हणाले होते की, मेडिकल टीमने दिलेल्या माहितीनुसार, तो या दौऱ्यावर जाऊ शकत नाही. या दौऱ्यावर जाण्यासाठी तो फिटनेस पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करत होता.मात्र, गेल्या आठवड्यात त्याला पुन्हा त्रास झाला. त्यामुळे एमआरआय काढण्यात आला. तो ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळू शकेल असं मला वाटत नाही. मला वाटलं होतं, तो काही सामन्यांसाठी उपलब्ध असेल. पण तो फिट झाला नाही, तर अडचणी वाढतील. हे खूप दुर्दैवी आहे. कारण आम्हाला त्याच्यासारखा गोलंदाज संघात हवा होता.

बंगाल-गुजरात लढतीत काय झालं?

बंगालने प्रथम फलंदाजी करताना २७९ धावांची मजल मारली. सुमंत गुप्ताने ६३ तर सुदीप कुमार घरामीने ५६ धावांची खेळी केली. गुजराततर्फे सिद्धार्थ देसाईने ४ विकेट्स पटकावल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना गुजरातचा डाव १६७ धावांतच गडगडला. कर्णधार मनन हिंगराजिआने ८० धावांची एकाकी झुंज दिली. बंगालकडून शाहबाझ अहमदने ६ विकेट्स पटकावल्या. शमीने ३ विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली. बंगालने दुसरा डाव २१४ धावांवर घोषित केला. अनुस्तूप मजुमदारने ५८ तर सुदीप कुमार घरामीने ५४ धावांची खेळी केली. सिद्धार्थ देसाईने ५ विकेट्स घेतल्या. बंगालने गुजरातला ३२७ धावांचं लक्ष्य दिलं. गुजरातचा डाव १८५ धावांतच आटोपला. उर्विल पटेलने १६ चौकारांसह १०९ धावांची दिमाखदार खेळी केली. जयमीत पटेलने ४५ धावा करत त्याला चांगली साथ दिली. बंगालतर्फे शमीने ५ विकेट्स पटकावल्या. शाहबाझने ३ विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली.