Mohammed Siraj ICC Test Bowling Ranking: भारत आणि वेस्टइंडिज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या कसोटीत भारतीय संघाने एकतर्फी विजयाची नोंद करत मालिकेत १-० ने आघाडी घेतली. हा सामना झाल्यानंतर आयसीसीकडून रँकिंग जाहीर करण्यात आली आहे. कसोटी गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराह अव्वल स्थानी आहे. तर मोहम्मद सिराजने आपल्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च रँकिंग मिळवली आहे. पण त्याला टॉप १० मध्ये स्थान मिळवता आलेलं नाही.
जसप्रीत बुमराह अव्वल स्थानी कायम
या रँकिंगची घोषणा होण्याआधीही जसप्रीत बुमराह अव्वल स्थानी होता. आता ८८५ रेटींग पाँईंट्ससह अव्वल स्थानी कायम आहे. बुमराह अव्वल स्थानी कायम असला तरीदेखील त्याची कामगिरी खालावली आहे. कारण त्याची आधीची रँकिंग ९०८ इतकी होती. जी आता ८८५ वर जाऊन पोहोचली आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. तर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेनरी या यादीत तिसऱ्या स्थानी आहे.
मोहम्मद सिराजची मोठी झेप
या यादीत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने मोठी झेप घेतली आहे. ७१८ रेटींग पाँई्ट्ससह सिराज या यादीत १२ व्या स्थानी पोहोचला आहे. ही त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटींग आहे. याआधी त्याने कधीच ७१८ चा आकडा गाठला नव्हता. बुमराहच्या अनुपस्थितीत त्याने अनेकदा वेगवान गोलंदाची भार आपल्या खांद्यावर घेतला आहे. जर अशीच गोलंदाजी करत राहिला, तर लवकरच तो टॉप १० गोलंदाजांच्या यादीत प्रवेश करू शकतो.
भारत आणि वेस्टइंडिज या दोन्ही संघांमधील पहिला कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात वेस्टइंडिजच्या फलंदाजांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. तर भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजने १४ षटकात ४० धावा खर्च करत ४ गडी बाद केले होते. तर दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना त्याने ११ षटकात ३१ धावा खर्च केल्या, मात्र यादरम्यान त्याला एकही गडी बाद करता आला नव्हता.