Mohammed Siraj LBW Wickets of Joe Root Jacob Bethell Video: भारत आणि इंग्लंड पाचव्या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराज भेदक गोलंदाजी करत आहे. सिराजने आतापर्यंत तीन विकेट घेतले असून तिन्ही विकेट फलंदाजांना पायचीत करत मिळवले. इंग्लंडच्या सलामीवीरांनी चांगली फलंदाजी करत इंग्लंडला वेगवान सुरूवात करून दिली. पण यानंतर भारताच्या गोलंदाजांनी फलंदाजांना फार काळ मैदानावर टिकू दिलं नाही. सिराजचा भेदक चेंडू रूटच्या पायाला लागताच त्याचा तोल गेला.
लंचब्रेकनंतर प्रसिध कृष्णाने जॅक क्रॉलीला बाद करत ब्रेकथ्रू मिळवून दिला. यानंतर मोहम्मद सिराजने झटपट ३ विकेट घेत इंग्लंडच्या मोठ्या फलंदाजांची शिकार केली. यामध्ये ऑली पोप, जो रूट आणि जेकब बेथल यांच्या विकेट आहेत. यादरम्यान मोहम्मद सिराजने मालिकेत १७ विकेच घेतले आहेत. यासह बेन स्टोक्स आणि सिराज यांनी सारखेच सर्वाधिक १७-१७ विकेट घेतले आहेत.
मोहम्मद सिराज ३३वे षटक टाकण्यासाठी आला होता. सिराजच्या पहिल्याच दोन चेंडूवर जो रूटने दोन चौकार मारले. यासह रूटने भारताविरूद्ध कसोटीत २ हजार धावांचा पल्ला गाठला आहे. रूट भारताविरूद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. यानंतर सिराजने अखेरचा चेंडू इतका कमाल होता की थेट पॅडवर जाऊन आदळला.
जो रूटच्या पॅडवर चेंडू आदळताच रूटचा तोल गेला आणि पडता पडता थोडक्यात वाचला. मैदानावरील पंचांनीही सिराजने अपील करताच बाद असल्याचं घोषित केलं, जो रूटने रिव्ह्यू घेतला. पण सिराजचा चेंडू इतक्या योग्य लाईन लेंग्थसह पॅडवर जाऊन आदळला होता की विकेटच्या बरोबर मधोमध लागला होता. यासह सिराजने भारताला मोठी विकेट मिळवून दिली.
सिराजचा घातक यॉर्कर अन् बेथल चारी मुंड्या चित
सिराजच्या ३७व्या षटकात बेथल पायचीत होत बाद झाला. बेथलने या षटकातील तिसऱ्या चेंडूवर चौकार मारला. यानंतर बेथलला सिराजने पुढचा चेंडू यॉर्कर टाकला. सिराजच्या या यॉर्कर चेंडूवर बेथल काहीच करू शकला नाही. सिराजचा उत्कृष्ट यॉर्कर पायात पडला आणि जाऊन पॅडवर आदळला. बेथल काहीच करू शकला नाही आणि पायचीत होत ५ धावा करत माघारी परतला.
इंग्लंडने दुसऱ्या सत्रात टीब्रेकपूर्वी ७ बाद २१५ धावा केल्या आहेत. दुसऱ्या सत्रात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत ६ विकेट्स घेतल्या आहेत.