India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना रोलर कोस्टर राईडपेक्षा कमी नव्हता. सामन्यातील चौथ्या दिवशी दोन्ही संघाना विजय मिळवण्याची सुवर्णसंधी होती. पण इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय संघाला विजयापासून दूर नेलं. चौथ्या दिवशी हॅरी ब्रुक आणि जो रूट यांनी दमदार शतकं झळकावली. त्यामुळे इंग्लंडचा संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता. पण, मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या विजयात अडथळा निर्माण केला. त्याने ५ गडी बाद करून भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. पण सिराजने जर हॅरी ब्रुकचा झेल घेतला असता, तर हा सामना इथपर्यंत पोहोचलाच नसता. या विजयानंतर सिराजने ब्रुकच्या झेलबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
नेमकं काय घडलं?
भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी ३७४ धावांचं आव्हान ठेवलं होतं. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला चांगली सुरूवात मिळाली होती. डकेट आणि क्रॉउले यांनी दमदार सुरूवात करून दिली होती. त्यानंतर हॅरी ब्रुक आणि जो रूट यांनी मिळून शतकी भागीदारी केली. हॅरी ब्रुकने या धावांचा पाठलाग करताना १११ धावांची खेळी केली. पण तो १९ धावांवर असतानाच बाद झाला असता. प्रसिध कृष्णाच्या गोलंदाजीवर हॅरी ब्रुकने मिड विकेटच्या दिशेने मोठा फटका मारला होता. सिराजकडे झेल घेण्याची संधी होती. त्याने झेल घेतल्यानंतर त्याचा पाय सीमारेषेला लागला होता. त्यामुळे ब्रुक थोडक्यात वाचला. त्यानंतर त्याने मिळालेल्या संधीचा फायदा घेत मोठे फटके मारले आणि आपलं शतक पूर्ण केलं.
ज्यावेळी ब्रुक मोठे फटके मारत होता, त्यावेळी कॅमेरा मोहम्मद सिराजकडे फिरवला जात होता. दरम्यान या सुटलेल्या झेलबाबत बोलताना सिराज म्हणाला, “या भावना शब्दात सांगता येणार नाहीत. काल माझ्यासोबत जी घटना घडली (हॅरी ब्रुकचा झेल) त्यावेळी आम्हाला वाटलं होतं की, आता सामना हातून निसटला. जर ब्रुक बाद झाला असता तर सामन्याचा निकाल आधीच वेगळा लागला असता. तो झेल घेतला असता तर आम्हाला सकाळी यावं लागलं नसतं. हा या सामन्यातील टर्निंग पाँईंट होता.”
सिराजने झेल सोडला, पण भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्याने पहिल्या डावात गोलंदाजी करताना ४ गडी बाद केले होते. तर दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना त्याने ५ गडी बाद केले. यासह त्याने दोन्ही डावात मिळून ९ गडी बाद केले. इंग्लंडचा संघ विजयापासून ४० धावा दूर होता. त्यावेळी ४ फलंदाजांना बाद करायचं होतं, ही जबाबदारी स्विकारून त्याने दमदार गोलंदाजी केली. त्याला प्रसिध कृष्णाने चांगली साथ दिली. पाचव्या दिवसाच्या शेवटी भारतीय संघाने हा सामना ६ धावांनी आपल्या नावावर केला.