Pakistan-Afghanistan Cricket Tri-Series: गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सशस्त्र संघर्ष सुरू आहे. शुक्रवारी पाकिस्तानच्या सैन्याने पक्तिका प्रांतात केलेल्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानच्या तीन स्थानिक क्रिकेटपटूंचा मृत्यू झाला. यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाने पाकिस्तान, श्रीलंकेसह पुढील महिन्यात होणाऱ्या तिरंगी टी-२० मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या या निर्णयावर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची (पीसीबी) प्रतिक्रिया समोर आली आहे. पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी यावर मोठे विधान केले.

५ ते २९ नोव्हेंबर दरम्यान लाहोर आणि रावळपिंडी येथे होणाऱ्या तिरंगी मालिकेत अफगाणिस्तान संघ सहभागी होणार होता. ज्यामध्ये पाकिस्तानसह श्रीलंकेचा संघही सहभागी होणार होता. मात्र पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत केलेल्या हवाई हल्ल्यामुळे अफगाणिस्तानमध्ये नाराजी पसरली आहे. अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार रशीद खानने या हल्ल्याचा रानटी असा उल्लेख केला आहे.

अफगाणिस्तानच्या संघाने माघार घेतली असली तरी नोव्हेंबरमध्ये होणारी तिरंगी मालिका नियोजित वेळेनुसार होईल, असे पीसीबीने म्हटले आहे. पीसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने पीटीआय वृत्तसंस्थेने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. पीसीबीने म्हटले की, अफगाणिस्तानच्या संघाची जागा घेण्यासाठी इतर पर्यायांचा विचार केला जात आहे. यात नेपाळ आणि युएईसह इतर सहयोगी सदस्य संघाचा विचार सुरू आहे. पण कसोटी खेळणाऱ्या संघाला मालिकेत घेण्यास प्राथमिकता दिली जाईल.

दरम्यान तिरंगी मालिकेत श्रीलंका सहभागी होणार आहे. पीसीबीच्या अधिकाऱ्याने म्हटले की, अफगाणिस्तानने माघार घेतली असली तरी तिरंगी मालिका वेळापत्रकानुसारच होईल. आम्ही इतर संघाचा विचार करत आहोत. अंतिम निर्णय झाल्यानंतर त्याची घोषणा केली जाईल.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरू असलेल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एसीबीचा हा निर्णय आला आहे. अलीकडेच ३८ तासांच्या शस्त्रविरामानंतरही पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून हल्ला केल्याचा आरोप अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने केला. यामुळे दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला आहे.

मालिकेतून बाहेर पडणे निषेधाचा उत्तम मार्ग

पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यात उरगुन जिल्ह्यातील कबीर, सिबगतुल्लाह आणि हारून या तीन क्रिकेटपटूंचा मृत्यू झाला. यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने हल्ल्याचा निषेध व्यक्त करत मृतांना आदरांजली व्यक्त केली. पाकिस्तान सरकारचा हा भ्याड हल्ला असल्याचे ते म्हणाले. या हल्ल्यामुळे अफगाणिस्तानच्या क्रीडा क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पाकिस्तानविरोधातील तिरंगी मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय मृतांबद्दल आदर आणि हिंसाचाराचा निषेध व्यक्त करण्याचा उत्तम मार्ग असल्याचे एसीबीने म्हटले.