चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नावावर नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. आयपीएलमध्ये १०० झेल घेण्याचा विक्रम महेंद्रसिंह धोनीच्या नावावर नोंदवला गेला आहे. चेन्नईकडून खेळताना महेंद्रसिंह धोनीने १०० झेल घेतले आहेत. यापूर्वी राजस्थान विरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार म्हणून हा त्याचा २००वा सामना खेळला होता. चेन्नई संघाचे २००वेळा नेतृत्व करण्याचा मान त्याला मिळाला होता. चेन्नईने २००८ मध्ये पहिला आयपीएल सामना खेळला होता. त्या सामन्यात धोनीने सराव सत्राला हजेरी लावली नव्हती. संघातील खेळाडूंना तो थेट बसमध्ये भेटला होता. धोनीनं चेन्नईसाठी आतापर्यंत सर्व सामन्यात नेतृत्व केलं आहे. २०१६-१७ च्या हंगामात धोनीने रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचे ३० सामन्यात नेतृत्व केले होते.
हैदराबादला जेसन रॉयच्या रुपाने पहिला धक्का बसला आहे. ७ चेंडूत केवळ २ धावा करून जेसन रॉय तंबूत परतला आहे. जेस हेझलवूडच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक धोनीने त्याचा झेल घेतला. जेसन रॉय तंबूत परतल्यानंतर केन विलियमसनकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र केन विलियमसनही मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. केन विलियमसन ११ चेंडूत ११ धावा करून बाद झाला. ड्वेन ब्राओच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. प्रियाम गर्गच्या माध्यमातून तिसरा धक्का बसला असून अवघ्या ७ धावा करून ब्राओच्या गोलंदाजीवर बाद झाला. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर वृद्धिमान साहाची विकेट मिळाली. वृद्धिमान साहा ४६ चेंडूत ४४ धावा करून बाद झाला. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर धोनीने त्याचा झेल घेतला. अभिषेक शर्मा आणि अब्दुल समादनं डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र संघाच्या १०९ धावा असताना अभिषेक शर्मा बाद झाला. जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर फाफने त्याचा झेल घेतला. तो तंबूत जात नाही तोवर समादही बाद झाला. जोशच्या गोलंदाजीवर मोइन अलीने झेल घेतला. लागोपाठ दोन गडी बाद झाल्याने हैदराबादच्या धावसंख्येवर परिणाम झाला. त्यानंतर जेसन होल्डरही कमाल करू शकला नाही. ५ धावा करून शार्दुल ठाकुरच्या गोलंदाजीवर बाद झाला.
चेन्नई आणि हैदराबाद या दोन संघात आतापर्यंत १५ सामने झाले आहेत. त्यापैकी ११ सामन्यात चेन्नईने, तर ४ सामन्यात हैदराबादने विजय मिळवला आहे. धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत खेळलेल्या १० सामन्यात १६ गुण मिळवले आहेत. त्यामुळे संघाचं प्लेऑफमधलं स्थान निश्चित झालं आहे. दुसरीकडे हैदराबादच्या संघाने १० सामन्यात ४ गुण मिळवले आहेत. त्यामुळे हैदराबादनं हा सामना गमवल्यास स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. सामना जिंकत प्रतिष्ठा राखण्याचं आव्हान हैदराबाद संघापुढे आहे. दुसरीकडे, धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघानं तीन आयपीएल चषक आपल्या नावावर केले आहे. २०१०, २०११ आणि २०१८ साली धोनीच्या नेतृत्वात आयपीएल चषकावर आपलं नाव कोरलं आहे.