एक मिनिट शिल्लक असताना ठाणे पोलिसांकडे एका गुणाची नाममात्र आघाडी होती. परंतु अनुभवी दिगंबर जाधवने निर्णायक चढाईत तब्बल पाच गुण घेत मुंबई बंदरला २१-१७ असा आश्चर्यकारक विजय मिळवून देण्याचे कर्तृत्व दाखविले. त्यामुळेच पाचंगणी व्यायाम मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या व्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पध्रेच्या अजिंक्यपदावर मुंबई बंदरला वर्चस्व राखता आले.
मध्यंतराला मुंबई बंदरने ७-३ अशी आघाडी घेतली, तेव्हा हा सामना एकतर्फी होण्याची चिन्हे दिसत होती. दुसऱ्या सत्राच्या प्रारंभी बंदरने पोलिसांवर पहिला लोणही चढविला. परंतु ठाणे पोलिसांच्या निशिकांत पाटीलने एका चढाईत चार गुण घेत सामन्याला कलाटणी दिली. त्यानंतर निशिकांतने अनुक्रमे दोन आणि एक गुण घेतल्यामुळे बंदरवर पहिला लोण चढला. निशिकांतच्या चढायांना पांचगणीतील क्रीडारसिक मुक्तकंठाने दाद देत होते. मुंबई बंदरकडून दादा आव्हाड आपल्या हुकूमी चढायांनी चांगला प्रतिकार करीत होता. तीन मिनिटे शिल्लक असताना पोलिसांकडे एका गुणाची आघाडी होती. अखेरच्या क्षणापर्यंत सामना कुणाकडे झुकेल याचा अंदाज वर्तविणे कठीण होते. मुंबई बंदरकडून आझम शेख आणि फिरोझ पठाण यांनी लाजवाब पकडी केल्या. मध्यरक्षक ५१ वर्षीय अनिल मोरेनेही जबरदस्त क्षेत्ररक्षण केले.
रेल्वे पोलिसांच्या सुरेंद्र थोरवेने मालिकावीर पुरस्काराचा मान मिळविला, तर मुंबई बंदरचे दिगंबर जाधव आणि फिरोझ पठाण अनुक्रमे सर्वोत्तम चढाईपटू आणि सर्वोत्तम पकडपटू ठरले. ‘‘या विजेतेपदामुळे आमचा विश्वास अधिक दृढ झाला असून, आगामी स्पर्धामध्ये आम्ही अशीच कामगिरी उंचावत राहू,’’ अशी प्रतिक्रिया मुंबई बंदरचे प्रशिक्षक महेंद्र साळवी यांनी व्यक्त केला.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Jan 2013 रोजी प्रकाशित
मुंबई बंदरची पोरं हुश्शार!
एक मिनिट शिल्लक असताना ठाणे पोलिसांकडे एका गुणाची नाममात्र आघाडी होती. परंतु अनुभवी दिगंबर जाधवने निर्णायक चढाईत तब्बल पाच गुण घेत मुंबई बंदरला २१-१७ असा आश्चर्यकारक विजय मिळवून देण्याचे कर्तृत्व दाखविले.
First published on: 22-01-2013 at 12:25 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai boyes are clever