मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट यांच्यात विजेतेपदाची झुंज

मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट हे भौगोलिकदृष्टय़ा महाराष्ट्र राज्याशीच नाते सांगणारे दोन संघ. आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेच्या दशकपूर्तीच्या विजेतेपदावर नाव कोरण्यासाठी रविवारी हैदराबादमध्ये हे दोन संघ एकमेकांशी झुंजणार आहेत. या वेळी शहरांची अस्मिता वगैरे अजिबात पणाला लागलेली नसली तरी एकापेक्षा एक दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेल्या संघांची अस्मिता मात्र जरूर पणाला लागली आहे.

कागदावर दोन्ही संघ बलवान आहेत. मात्र यंदाच्या हंगामातील मैदानावरील कामगिरीचा आढावा घेतल्यास पुणे संघाने मुंबईला ‘क्वालिफायर-१’ लढतीसह तीनदा हरवले आहे. अगदी आतापर्यंतच्या पाच लढतींचा आढावा घेतला तरी मुंबईला एकदाच पुण्याला हरवणे शक्य झाले आहे. मात्र अंतिम फेरीच्या सामन्यात मुंबई वेगळ्या ईष्रेने खेळेल, यात शंका नाही.

दोन वेळा आयपीएल विजेतेपदाला गवसणी घालणारा मुंबईचा संघ चौथ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत खेळत आहे. त्यामुळे विजेतेपदासाठी मुंबईचेच पारडे जड मानले जात आहे. मात्र पुण्याच्या संघातील महेंद्रसिंग धोनी विक्रमी सातव्यांदा आयपीएलचा अंतिम फेरीचा सामना खेळत आहे, याकडेही डोळेझाक करता येणार नाही.

कर्णधार रोहित शर्मा, किरॉन पोलार्ड, हरभजन सिंग आणि अंबाती रायुडू यांच्यासारख्या मुंबई इंडियन्सच्या काही दिग्गज खेळाडूंनी विजेतेपदाची चव चाखली आहे. २०१३ आणि २०१५च्या संघात त्यांचा समावेश होता. मुंबईची दुसरी फळीसुद्धा सक्षम आहे. जोस बटलर जेव्हा माघारी परतला, तेव्हा लेंडल सिमन्सने जबाबदारीने सलामीची धुरा सांभाळली. मिचेल मॅक्क्लिनॅघन (१९ बळी) किंवा मिचेल जॉन्सन प्रतिस्पर्धी फलंदाजांवर अंकुश ठेवत आहेत.

यंदाच्या हंगामात नितीश राणा (३३३ धावा) हा फलंदाजीतील नवा हिरा मुंबईला गवसला आहे. मात्र दुखापतीतून सावरल्यानंतर अंबाती रायुडूला पुन्हा आपले स्थान मिळवता आले आहे. हरभजन सिंग फलंदाजांना जखडून ठेवू शकतो. मात्र तरीही संघ व्यवस्थापनाने लेग-स्पिनर कर्ण शर्मावर विश्वास प्रकट केला आहे. दुसऱ्या पात्रता लढतीत कोलकाता नाइट रायडर्सच्या फलंदाजांनी त्याचा चांगलाच धसका घेतला होता. याशिवाय अखेरच्या षटकांमधील सर्वोत्तम गोलंदाज लसिथ मलिंगा आणि जसप्रीत बुमराह त्यांच्याकडे आहेत. किरॉन पोलार्ड कठीण परिस्थितीत संघाला तारू शकतो. कृणाल आणि हार्दिक या पंडय़ा बंधूंचे अष्टपैलुत्व मुंबईला विजयपथावर नेणारे आहे. याशिवाय कर्णधार रोहित शर्मा एकहाती सामना जिंकून देऊ शकतो.

मुंबईकडे विजेतेपद जिंकून देऊ शकणारी सारी सांघिक क्षमता असली तरी पुण्याकडे माही असल्याचा बराच फरक पडतो. २००८ मध्ये आयपीएलच्या गौरवशाली अध्यायाला प्रारंभ झाल्यापासून धोनीला ही स्पर्धा कशी जिंकतात, याचे सूत्र ठाऊक आहे. आतापर्यंत सहा वेळा आयपीएलचा अंतिम सामना खेळणाऱ्या धोनीने चेन्नई सुपर किंग्जला २०१० आणि २०११ असे  सलग दोनदा विजेतेपद जिंकून दिले आहे. त्यामुळे शेन वॉर्न, अ‍ॅडम गिलख्रिस्ट आणि डेव्हिड वॉर्नर या आयपीएल जेतेपद पटकावणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या पंक्तीत सामील होऊ इच्छिणाऱ्या स्टीव्ह स्मिथला धोनीचा अनुभव उपयुक्त ठरणार आहे.

धोनीचे वर्चस्व यंदाच्या हंगामात दिसू शकले नसले तरी पुण्याच्या दोन विजयांमध्ये त्याचे महत्त्वाचे योगदान होते. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात धोनीने विजयवीराची भूमिका बजावली होती. याचप्रमाणे वानखेडे स्टेडियमवरील पहिल्या पात्रता लढतीत (क्वालिफायर-१) धोनीने अखेरच्या दोन षटकांमध्ये पाच षटकारांची आतषबाजी करीत मुंबईची पकड सैल केली. पुढील हंगामात धोनी पुन्हा चेन्नईची पिवळी जर्सी परिधान करीत आयपीएलमध्ये अवतरेल; परंतु अयोग्य पद्धतीने कर्णधारपदावरून हकालपट्टी केल्यानंतरही धोनीने आपली किमया दाखवली आहे.

मागील हंगामात पुण्याला अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. मात्र यंदाच्या हंगामात स्मिथच्या नेतृत्वाखाली संघाने त्वेषाने भरारी घेतली आहे. लिलावात साडेचौदा कोटींची सर्वाधिक बोली जिंकणाऱ्या बेन स्टोक्सनेही त्या किमतीला न्याय देणारी कामगिरी साकारली. मायदेशात परतण्यापूर्वी स्टोक्सच्या खात्यावर ३१६ धावा आणि १२ बळी जमा आहेत. राहुल त्रिपाठीवर (३८८ धावा) पुण्याच्या फलंदाजीची प्रमुख भिस्त असेल. इम्रान ताहीर (१८ बळी) मायदेशी परतल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर हे फिरकीचे आणखी एक अस्त्र त्यांच्याकडे असल्याचे सिद्ध झाले आहे. याशिवाय स्मिथ (४२१ धावा) आणि मनोज तिवारी (३१७ धावा) हेसुद्धा फॉर्मात आहेत. तसेच जयदेव उनाडकट (२२ बळी) आणि शार्दूल ठाकूर पुण्याच्या वेगवान माऱ्याची मदार सांभाळत आहेत.

रायझिंग पुणे सुपरजायंट

  • स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), राहुल त्रिपाठी, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंग धोनी (यष्टिरक्षक), मनोज तिवारी, रजत भाटिया, लॉकी फग्र्युसन, डॅन ख्रिस्तियन, शार्दूल ठाकूर, जयदेव उनाडकट, दीपक चहर, राहुल चहर, अ‍ॅडम झम्पा, अंकुश बेन्स, अंकित शर्मा, बाबा अपराजित, अशोक दिंडा, मयांक अगरवाल, जसकरण सिंग, ईश्वर पांडे, मिलिंद टंडन.

मुंबई इंडियन्स

  • रोहित शर्मा (कर्णधार), लेंडल सिमन्स, पार्थिव पटेल (यष्टिरक्षक), किरॉन पोलार्ड, अंबाती रायुडू, कृणाल पंडय़ा, हार्दिक पंडय़ा, कर्ण शर्मा, मिचेल मॅक्क्लिनॅघन, लसिथ मलिंगा, मिचेल जॉन्सन, नितीश राणा, जसप्रीत बुमराह, सौरभ तिवारी, आर. विनय कुमार, टिम साऊदी, जीतेश शर्मा, कृष्णप्पा गोथम, श्रेयस गोपाळ, कुलवंत खेजरोलिया.