एरव्ही घडय़ाळाच्या काटय़ावर धावणाऱ्या मुंबईकरांसाठी रविवार म्हणजे उशिरापर्यंत लोळत राहण्याचा आणि मौजमजा करण्याचा दिवस, पण या रविवारी मुंबईकरांना सकाळपासूनच ‘धावपळ’ करावी लागणार आहे. निमित्त आहे ते स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉन शर्यतीच्या ११व्या पर्वाचे. गुलाबी थंडी.. समुद्रकिनाऱ्यांवरून वाहणारे थंड वारे.. दवाचे थेंब अंगावर झेलत आणि धुक्यातून मार्ग काढत मुंबईकरांना मार्गक्रमणा करावी लागणार आहे. स्वत:ची तंदुरुस्ती राखण्यासाठी, सामाजिक संदेश देण्यासाठी तसेच सामाजिक संस्थांसाठी निधी उभारण्याच्या या चळवळीत योगदान देता यावे, यासाठी या वर्षी तब्बल ४० हजार स्पर्धक या शर्यतीत सहभागी होणार आहेत.
मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेली आणि हक्काची मॅरेथॉन शर्यत या रविवारी रंगणार आहे. वर्षांच्या सुरुवातीला तिसऱ्या रविवारी होणाऱ्या या शर्यतीत सहभागी होण्यासाठी प्रत्येक जण कित्येक महिन्यांपासून सराव करत असतो. मॅरेथॉन स्पर्धा जवळ आली की, मुंबईच्या रस्त्यांवर सकाळच्या वेळेला दिसणारे हे चित्र नित्यनेमाचे झाले आहे. यंदा पारा जास्त खाली आल्यामुळे वातावरणात सकाळपर्यंत गारवा असणार आहे. त्यामुळे मॅरेथॉनमधील विश्वविक्रमाची नोंद होतेय का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. केनियाच्या विल्सन किपसांगने गेल्या वर्षी बर्लिन मॅरेथॉनमध्ये २ तास ३ मिनिटे २३ सेकंद अशी वेळ देत विश्वविक्रमाला गवसणी घातली होती. मुंबई मॅरेथॉन शर्यतीदरम्यान हा विक्रम मोडून काढण्यासाठी केनिया आणि इथिओपियाचे धावपटू सज्ज झाले आहेत.
पूर्ण मॅरेथॉन शर्यतीवर केनिया आणि इथिओपियांच्या अॅथलीट्सचा दबदबा राहिला असून या वर्षीही पुरुषांमध्ये जेतेपद पटकावण्यासाठी चढाओढ रंगणार आहे. केनियाचा इव्हान्स चेरूईयोट (२.०६.२५ सेकंद) हा जेतेपदासाठी दावेदार मानला जात आहे. २ तास १० मिनिटांपेक्षा कमी वेळेत शर्यत पूर्ण करणारे तब्बल १६ अॅथलीट्स या वेळी जेतेपदासाठी झुंजणार आहेत. चेरूईयोट याच्यासह इथिओपियाचे ईशेतू वेंडिमू, हायलू मेकोनेन तसेच स्टीफन चेबोगट ((केनिया) आणि मुंबई मॅरेथॉनमधील गतविजेते जॉन केलई (२००७, २००८), केनेथ मुंगारा (२००९) व गिरमा असेफा (२०११) हेदेखील विजेतेपद राखण्यासाठी उत्सुक आहे.
महिलांमध्ये दिनकेश मेकाश, इथालेमाहू किदाने, अस्नाकेच मेंगिस्तू, अबेरू मेकुरिया (सर्व इथिओपिया) तसेच युनिस कालेस (केनिया), ग्लॅडिस किपसोय, हेलालिया जोहानेस (नामिबिया), युलिया रुबान (युक्रेन) या धावपटूंमध्ये पहिला क्रमांक पटकावण्यासाठी चुरस रंगणार आहे.
आशियातील सर्वात श्रीमंत मॅरेथॉन स्पर्धा असा नावलौकिक मिळवणाऱ्या मुंबई मॅरेथॉन शर्यतीत विजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय पुरुष आणि महिला धावपटूंना प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस देऊन गौरवण्यात येणार आहे. त्याचबरोबर भारतीयांमध्ये नवा स्पर्धाविक्रम नोंदवणाऱ्या धावपटूंना १ लाख रुपयांचे बोनस इनामही देण्यात येणार आहे. स्पर्धेत विक्रम नोंदवणाऱ्या खेळाडूला १५ हजार अमेरिकन डॉलरचे बक्षीस देण्यात येईल. त्यामुळे जेतेपदासाठी जबरदस्त मुकाबला रंगणार आहे. पुरुषांमध्ये गतविजेता बिनिंग लिंगखोईसमोर रामसिंग यादवचे आव्हान असणार आहे. रामसिंगने २०१२च्या मुंबई मॅरेथॉन शर्यतीत ‘ब’ दर्जाचा निकष पार करत लंडन ऑलिम्पिकसाठी स्थान मिळवले होते. लिंगखोई, रामसिंगसह एलाम सिंग, करण सिंग, व्ही. एल. डांगी, बुधा राम, सनवरू यादव आणि अरविंद कुमार यादव व के. सी. रामू यांच्यात विजेतेपदासाठी तगडा मुकाबला रंगणार आहे.
भारतीय महिलांमध्ये ललिता बाबर हॅट्ट्रिक साजरी करण्यासाठी उत्सुक आहे. तिला विजयमाला पाटील, रोहिणी राऊत, नीलम राजपूत, भगवती देवी, अनिसा देवी, एम. सुधा यांच्यासह मनीषा साळुंखे, रश्मी गुरनुळे आणि सुप्रिया पाटील यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. अर्ध मॅरेथॉन शर्यतीत पुरुषांमध्ये शोजी मॅथ्यू, बीसी तिलक, इंद्रजित पटेल, योगेश सरदेसाई, अजय बिर सिंग आणि विश्राम मीना हे अव्वल धावपटू सहभागी होणार आहेत. महिलांमध्ये सुधा सिंग, ‘सावरपाडा एक्स्प्रेस’ कविता राऊत, मोनिका राऊत यांच्यासह स्वाती गढवे आणि सीमा या अव्वल धावपटू जेतेपदासाठी आपला अनुभव पणाला लावणार आहेत.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स-४, डीडी स्पोर्ट्स
वेळ : सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत.
पूर्ण मॅरेथॉन (४२.१९७ कि.मी.)
स्पर्धक : ३६००
वेळ : सकाळी ७.२० मिनिटांनी सीएसटी येथे
अर्धमॅरेथॉन (२१.०९७ कि.मी.)
स्पर्धक : १४२००
वेळ : सकाळी ६.०० वाजता वांद्रे अग्निशमन दल केंद्र येथे
ड्रीम-रन (७ कि.मी.)
स्पर्धक : २०१५०
वेळ : सकाळी ९.०० वाजता सीएसटी येथे
सुविधा काय असतील?
*सुरुवातीच्या आणि समारोपाच्या मार्गावर दहशतवाद विरोधी पथकाचे २२ जवान शर्यतीवर नजर ठेवून असतील. शर्यतीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी साध्या गणवेशात हे जवान उंच बिल्डिंगवरून नजर ठेवतील.
*धावताना एखाद्या स्पर्धकाच्या छातीत दुखू लागले, तर मोबाइलद्वारे त्या व्यक्तीचा ईसीजी काढण्याची प्रणाली या वर्षी प्रथमच ठेवण्यात आली आहे.
*दोन मुख्य वैद्यकीय थांब्यांसह एकूण १२ ठिकाणी वैद्यकीय उपचार घेण्याची सोय. आठ अॅम्ब्युलन्स आणि ३५० डॉक्टरांची फौज तैनात.
*शर्यतीच्या दिवशी २५ पेक्षा अधिक ठिकाणी एक लाख ३५ हजार लिटर पाणी उपलब्ध.
*निर्जलीकरणाचा त्रास होऊ नये यासाठी आठ ठिकाणी उत्साहवर्धक पेय, ११ ठिकाणी संत्री मिळणार.
*शरीर थंड ठेवण्यासाठी पूर्ण मॅरेथॉनच्या मार्गावर दोन ठिकाणी अॅथलीट्सवर थंड पाण्याचा शिडकावा होणार.
*अॅथलीट्सना मार्ग दाखवण्यासाठी १९५० पोलीस तसेच वाहतूक अधिकारी, एक हजार खासगी सुरक्षारक्षक आणि एक हजार सुरक्षारक्षकांचा बंदोबस्त.