संदीप कदम, लोकसत्ता
मुंबई : मुंबई..हे शहर कधी झोपत नाही असे म्हणतात. दिवस-रात्र हे शहर नेहमी धावतच असते. रविवारी सकाळीही मुंबई आणि मुंबईकर धावले ते मॅरेथॉनच्या निमित्ताने. करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे न होऊ शकलेली मुंबई मॅरेथॉन स्पर्धा या वेळी दिमाखात पार पडली. सर्व धावपटूंमध्ये उत्साहाचे वातावरण होते. नेहमीच आपले धकाधकीचे आयुष्य जगणारा मुंबईकर आपल्या तंदुरुस्तीसाठी धावताना दिसत होता. गेले काही दिवस मुंबईकर स्पर्धेची तयारी करतानाही पाहायला मिळाले. या मॅरेथॉनमधील वरिष्ठ नागरिकांची स्पर्धा आणि ड्रीम रनमध्ये मोठय़ा प्रमाणात स्पर्धक सहभागी झाले होते. एकूण ५५ हजार स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
एकीकडे ‘एलिट’ गटातील धावपटू अग्रस्थानासाठी झगडताना दिसतात, तर दुसरीकडे हौस म्हणून या स्पर्धेत सहभागी झालेल्या धावपटूंचे मॅरेथॉन पूर्ण करणे हेच लक्ष्य असते. ते मॅरेथॉनचा पुरेपूर आनंद घेताना दिसतात. मॅरेथॉनच्या व्यासपीठावरून सामाजिक प्रबोधनाचे कार्यही केले जाते. या मॅरेथॉनच्या माध्यमातून मुंबईकर एकवटलेला दिसतो. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती असो, त्यांचा मॅरेथॉनमधील उत्साह हा पाहण्यासारखा असतो. करोना प्रादुर्भावाच्या कठीण काळातून सावरत मुंबईकर या स्पर्धेत एकवटताना दिसले. रस्त्याच्या दुतर्फा अनेक जण धावपटूंचा उत्साह वाढवताना दिसले. दिव्यांग असो की वयस्क, सर्व जण या वातावरणाशी समरस झालेले पाहायला मिळाले.
या मॅरेथॉनच्या वेळी केंद्रीय विधी व न्यायमंत्री किरेन रिजिजू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गीतकार गुलजार, माजी बॅडिमटनपटू पुलेला गोपीचंद, अभिनेता मििलद सोमण, जावेद जाफरी यांची उपस्थिती लक्षणीय होती. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला.
इक्बाल सिंह चहल यांचा अर्ध-मॅरेथॉनमध्ये सहभाग
मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी माहीम रेती बंदर ते आझाद मैदान या २१.०९७ किमी मुंबई अर्ध-मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना आयुक्त म्हणाले की, मी आत्तापर्यंत सर्व मुंबई मॅरेथॉन स्पर्धामध्ये सहभाग घेतला आहे. ही १८वी मुंबई मॅरेथॉन स्पर्धा असून या स्पर्धेच्या आयोजकांना आम्ही पूर्णपणे सहकार्य केले आहे. मॅरेथॉनसाठी साफसफाई, प्रकाश योजनाही पालिकेकडून करण्यात आली आहे.
मुंबई मॅरेथॉनमध्ये १९८३ जण किरकोळ जखमी
मुंबई : मुंबईमधील वाढत्या प्रदुषणामुळे रविवारी झालेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये १९८३ जणांना वैद्यकीय उपचाराची आवश्यकता भासली. यातील ४० टक्के रुग्णांना निर्जळीकरणाचा त्रास झाला. तर ५५ टक्के धावपटूंच्या पायात गोळे येणे, पायांचे स्नायू दुखणे आणि किरकोळ दुखापत झाली. मॅरेथॉनदरम्यान त्रास झालेल्या धावपटूंपैकी १४ धावपटूंना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील पाच जणांना सैफी रुग्णालयात, चार जणांना बॉम्बे रुग्णालय, तीन जणांना जसलोक तर दोन जणांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.