आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय खेळाडूंच्या सहभागामुळे नावाजलेल्या मुंबई मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून गेली १४ वष्रे समाजकल्याणाचे कार्य केले जात आहे. या स्पध्रेत सहभाग घेत आतापर्यंत जवळपास पाचशेहून अधिक स्वयंसेवी संस्थांनी विविध सामाजिक उपक्रमांकरिता दोनशे कोटींपर्यंत निधी गोळा केला आहे. २००४ साली पहिल्यांदा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आणि त्या वर्षी एक कोटी ४४ लाख रुपयांचा निधी स्वयंसेवी संस्थांनी जमा केला. स्पध्रेच्या प्रसिद्धीबरोबरच निधीचा हा आकडा वाढत राहिला. यंदा या आकडय़ाने उच्चांक गाठताना ३२ कोटी ९३ लाख रुपये जमा केले आहेत.
मागील १४ वर्षांतील या समाजोपयोगी आकडेवारीवर नजर टाकल्यास ती १९५ कोटी ५६ लाख इतकी जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धाना तोडीस तोड टक्कर देण्याबरोबरच मुंबई मॅरेथॉनने समाजकल्याणासाठी त्यांच्या परीने हातभार लावण्याचा प्रयत्न केला आहे.
यंदाच्या मॅरेथॉन स्पध्रेत वैयक्तिक प्रकारात रमाणी आणि त्यांचे पती शंकर रमण यांनी एकूण १ कोटी २५ लाख ८६ हजार ५०० रुपयांचा, तर संस्थांतर्गत अमर सेवा संगमने १ कोटी २७ लाख ५१,५०० रुपयांचा निधी गोळा केला. दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या तामिळनाडूच्या अमर सेवा संगम संस्थेने यंदा सर्वाचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी विविध संस्थांच्या गटासह वैयक्तिक गटातही उल्लेखनीय कामगिरी करून एकूण अडीच कोटीपर्यंतचा निधी गोळा केला.
‘‘मुंबई मॅरेथॉन स्पध्रेतून आमच्या संस्थेला बराच हातभार लागला आहे. गेली ३० वष्रे आम्ही दिव्यांग मुलामुलींसाठी कार्य करीत आहोत. त्यांच्या शिक्षणाबरोबरच उपजीविकेसाठी विशेष प्रशिक्षण आम्ही देतो. ७ मुलांपासून सुरू झालेला हा प्रवास आता ४ ते ५ हजापर्यंत पोहोचला आहे आणि त्यामुळे आमची जबाबदारीही वाढली आहे. मुंबई मॅरेथॉनमधून जमा होणाऱ्या निधीची आकडेवारी अमाप आहे आणि त्याने आम्हाला बरीच मदत होते,’’ असे मत अमर सेवा संगम संस्थेच्या सहसंस्थापक रमाणी शंकर रमण यांनी व्यक्त केले.
‘युनायटेड वे मुंबई’ (यूडब्लूएम) या संस्थेच्या अंतर्गत सर्व स्वयंसेवी संस्था मॅरेथॉनमध्ये सहभागी होतात. संस्थेला मिळणारी देणगी ही यूडब्लूएममार्फत वितरित केली जाते. मुंबई मॅरेथॉनच्या या उपक्रमाबाबत यूडब्लूएमच्या कार्यकारी संचालक जयंती शुक्ला म्हणाल्या की, म्हणाल्या की, ‘‘समाजात काही तरी वेगळे करून दाखवण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांसाठी मुंबई मॅरेथॉन हे योग्य व्यासपीठ आहे. विविध उपक्रमांसाठी स्पध्रेच्या माध्यमातून निधी गोळा केला जातो. समाजातील तळागाळातल्या लोकांसाठी काम करणाऱ्या संस्थांना यातून बरीच मदत मिळते. या सामाजिक उपक्रमाशी जोडल्याचा आम्हाला अभिमान वाटतो.’’