|| ऋषिकेश बामणे

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर जवळपास ११ वर्षांपूर्वी भारताच्या वरिष्ठ क्रिकेट संघाने अखेरचा विश्वचषक उंचावला. त्यानंतर एका दशकाहून अधिक काळ ओलांडला तरी भारताचा विश्वचषकाचा शोध कायम आहे. याच्या अगदी उलट भारतीय युवा संघ. गेल्या १० वर्षांत भारताने अनुक्रमे २०१२, २०१८ आणि २०२२ अशी १९ वर्षांखालील वयोगटाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची तीन जेतेपदे मिळवली. युवकांच्या या यशामुळेच भारताचे भविष्य उज्ज्वल आहे, असे अनेक वर्षांपासून म्हटले जाते. परंतु प्रत्यक्षात युवा खेळाडूंचे यश हे वरिष्ठ पातळीवर परिवर्तित होत नसल्याचेच सिद्ध होते आहे.

यश धूलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आठवडय़ाभरापूर्वीच वेस्ट इंडिजमध्ये विजय पताका फडकावली. अंतिम फेरीत भारताने इंग्लंडला नमवून एकूण पाचव्यांदा युवा विश्वचषक जिंकला. दर दोन वर्षांनी होणाऱ्या युवा विश्वचषकात नव्या खेळाडूंना संधी देण्यात यावी, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) धोरण आहे. त्यामुळे कोणत्याही खेळाडूला एकदाच युवा विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी लाभते. २०२० पासून करोनामुळे टाळेबंदी लागू करण्यात आल्याने स्थानिक स्पर्धाचे आयोजन कोलमडले. त्यामुळे सध्याच्या युवा संघाला विश्वचषकाच्या अनुषंगाने तयारी करण्यासाठी पुरेशा स्पर्धा मिळाल्या नाहीत. तरीही डिसेंबरमध्ये झालेल्या आशिया चषकात भारताने नेहमीप्रमाणे वर्चस्व गाजवले.

विश्वचषकातील सलामीच्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली. परंतु त्यानंतर कर्णधार धूलसह सहा जणांना करोनाची लागण झाली. त्यामुळे भारताला उरलेल्या ११ खेळाडूंसह पुढील दोन साखळी लढतींमध्ये खेळावे लागले. अशा स्थितीतही निशांत सिंधूच्या नेतृत्वाखाली भारताने आर्यलड, युगांडा या संघांचा अक्षरश: धुव्वा उडवला. त्यामुळे भारताच्या दुसऱ्या फळीतील खेळाडूही तितकेच सक्षम असल्याचे सिद्ध झाले.

गटातील अग्रस्थानासह भारताने दिमाखात उपांत्यपूर्व फेरी गाठली. यादरम्यान १० दिवसांचा कालावधी उलटल्याने धूल, उपकर्णधार शेख रशीद करोनावर मात करून संघात परतले. गतविजेत्या बांगलादेशवर भारताने वर्चस्व गाजवून उपांत्य लढतीतील स्थान पक्के केले. बलाढय़ ऑस्ट्रेलियाविरुद्ध धूलच्या शतकामुळे भारताने दिमाखदार विजय नोंदवला आणि मग अंतिम लढतीत गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीमुळे इंग्लंडला नेस्तनाबूत केले.

विश्वचषकातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या (नाबाद १६२) नोंदवणाऱ्या अष्टपैलू राज बावाने अंतिम फेरीत पाच बळी मिळवण्याचा पराक्रम केला. मुंबईकर अंक्रिश रघुवंशीने भारतासाठी स्पर्धेत सर्वाधिक २७८ धावा, तर महाराष्ट्राचा फिरकीपटू विकी ओस्तवालने सर्वाधिक १३ बळी मिळवले. धूलचे प्रभावी नेतृत्व, रशीदने दडपणाखाली केलेली तंत्रशुद्ध फलंदाजी आणि भेदक मारा करणारा रवी कुमार हेसुद्धा कौतुकास तितकेच पात्र आहेत. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (एनसीए) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण आणि प्रशिक्षक ऋषिकेश कानिटकर यांचे मार्गदर्शन संघाला अखेपर्यंत अपराजित ठेवण्यात मोलाचे ठरले.

मात्र या यशानंतर आता पुढे काय, हा प्रश्न उद्भवतोच. २०१२ मध्ये उन्मुक्त चंदने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम फेरीत अप्रतिम शतक साकारून भारताला जेतेपद मिळवून दिले. त्या वेळी उन्मुक्तला थेट भारताच्या मुख्य संघात स्थान देण्यात यावे, इथपर्यंत चर्चा रंगली. मात्र आज १० वर्षांनी उन्मुक्तने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला असून सध्या तो ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये खेळतो. याव्यतिरिक्त त्या स्पर्धेत चमकणारे महाराष्ट्राचा विजय झोल, संदीप शर्मा, बाबा अपराजित यांनाही अपेक्षेप्रमाणे भरारी घेता आली नाही.

त्याचप्रमाणे २०१८च्या विश्वविजेत्या संघातील पृथ्वी शॉ, शुभमन गिल आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळालेल्या संधीचा लाभ उचलण्यात तितके यशस्वी ठरलेले नाहीत. त्याशिवाय क्रिकेटव्यतिरिक्त अन्य प्रकरणांमध्ये त्यांचे नाव अधिक चर्चेत राहते. तर शिवम मावी, कमलेश नागरकोटी असे ताशी १४० किमीपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करणारे खेळाडू ‘आयपीएल’पुरताच मर्यादित राहिले आहेत. २०१६ आणि २०२० मध्ये भारताला युवा विश्वचषकात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यापैकी इशान किशन, ऋषभ पंत आता भारतीय संघात स्थिरस्थावर होत आहेत.

अल्पावधीत मिळणारा प्रकाशझोत, वरिष्ठ संघातील वाढती स्पर्धा युवा खेळाडूंसाठी अडथळा ठरत आहे. त्याव्यतिरिक्त, रणजी, विजय हजारे यांसारख्या स्थानिक स्पर्धाकडे कानाडोळा केल्यामुळे भारताच्या मुख्य संघात थेट संधी मिळाल्यावर हे खेळाडू दडपणाखाली ढेपाळतात. द्विराष्ट्रीय मालिकांमध्ये भारत प्रतिस्पर्धीवर सहज वर्चस्व गाजवतो. गुणवत्ता शोध विकास मोहिमेमुळे (टीआरडीओ) भारताला देशाच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू गवसले आहेत. मात्र ‘आयसीसी’ स्पर्धामध्ये गेल्या काही वर्षांपासून हुलकावणी देणारे जेतेपद भारतासाठी निराशाजनक ठरत आहे.

मागील चार ट्वेन्टी-२० विश्वचषकापैकी फक्त २०१४लाच भारताला अंतिम फेरी गाठता आली. तर २०१५ आणि २०१९च्या एकदिवसीय विश्वचषकात उपांत्य फेरीत भारताने गाशा गुंडाळला. २०१३ मध्ये चॅम्पियन्स करंडक जिंकण्याच्या घटनेलाही पुढील वर्षी १० वर्षे पूर्ण होतील. गतवर्षी झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारतावर साखळीतच गाशा गुंडाळण्याची नामुष्की ओढवली. त्यामुळे भारताच्या भविष्याचा विचार करता ‘बीसीसीआय’ युवा फळीला योग्य दिशा दाखवण्यासाठी अधिक प्रभावी पावले उचलतील आणि यंदा वर्षांखेरीस होणारा ट्वेन्टी-२० विश्वचषक अथवा पुढील वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापैकी एकावर तरी भारतीय संघ मोहोर उमटवण्यात यशस्वी होईल, अशी आशा बाळगूया.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

rushikesh.bamne@expressindia.com