Muneeba Ali Run Out Controversy What is ICC Rule: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक सामन्यात पाकिस्तानची सलामीवीर बाद होण्यावरून बराच वाद निर्माण झाला. मुनीबा अलीला धावबाद दिल्याने पाकिस्तानी कर्णधार फातिमा सना हिने पंचांशी बराच वेळ वाद घातला. सामनादेखील या वादामुळे काही वेळासाठी थांबला होता. पण मुनीबा अली ज्या पद्धतीने धावबाद झाली, त्यामागे नेमका काय नियम आहे, जाणून घेऊया.
भारतीय महिला संघ या सामन्यात ५० षटकांत केवळ २४७ धावाच करू शकला. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानी संघाला चौथ्या सामन्याक पहिला धक्का बसला. ही पहिली विकेट वादाचं मोठं कारण ठरली. ही घटना चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर घडली. क्रांती गौडचा चेंडू सलामीवीर मुनीबा अलीच्या पॅडवर लागला. क्रांतीने पायचीतसाठी अपील केलं, परंतु पंचांनी नकार दिला.
दरम्यान, मुनीबा अली क्रीजच्या बाहेर गेली होती आणि दीप्ती शर्माने चेंडू उचलत स्टंपवर थ्रो केला. मुनीबाने तिची बॅट क्रीजच्या आत ठेवली, पण जेव्हा बॉल स्टंपवर आदळला तेव्हा तिची बॅट जमिनीपासून थोडी वर होती. तर तिचं शरीर क्रीजच्या बाहेर होतं. यावरून तिसऱ्या पंचांनी तिला बाद दिलं. मुनीबाची विकेट पाहून फातिमा सना हिने चौथ्या पंचांशी वाद घातला, त्यामुळे काही वेळ सामनाही थांबला होता.
मुनीबा अलीच्या वादग्रस्त विकेटबाबत काय आहे आयसीसीचा नियम?
१. आयसीसी नियम ३०.१ नुसार, चेंडू स्टंपवर आदळतो तेव्हा फलंदाजाची बॅट किंवा शरीर क्रिजच्या बाहेर असेल तर त्याला धावबाद घोषित केले जाईल.
२. नियम ३०.१.२ नुसार, जर एखाद्या फलंदाजाने त्याची बॅट क्रीजच्या आत ठेवली नाही आणि त्याचे शरीर क्रीजच्या बाहेर असेल तर तो धावबाद होईल. चेंडू डेड होईपर्यंत फलंदाजाने क्रीजच्या आतच राहणं गरजेचं आहे.
३. मुनीबा अलीला बाद देण्यात आलं कारण फलंदाज धाव घेतल्यानंतरही क्रीजवर पोहोचली नाही किंवा डाईव्हही करू शकली नाही. दोन्ही बाबतीत, जर तिची बॅट क्रीजवरच्या आत असती आणि नंतर उठली असती तर ती नॉट आऊट असती.