अँडी मरेने एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स टेनिस स्पर्धेत मिलोस राओनिकवर संघर्षपूर्ण विजय मिळवत उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जिवंत राखल्या आहेत. मरेने ही लढत ६-३, ७-५ अशी जिंकली. राओनिकने मरेवर विजय मिळवला असता तर मरेचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असते. मात्र जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असणाऱ्या मरेने शानदार विजय मिळवत आपले आव्हान कायम राखले. पुढच्या लढतीत मरेचा मुकाबला या स्पर्धेचे सहा वेळा जेतेपद पटकावणाऱ्या रॉजर फेडररशी होणार आहे. दुसरीकडे दोन्ही लढतींत पराभूत झालेल्या राओनिकला गाशा गुंडाळावा लागण्याची शक्यता आहे.