‘स्थानिक क्रिकेटमधील महासत्ता’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईला मंगळवारी सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. अखेरच्या लढतीत बडोद्याचा ८२ धावांनी धुव्वा उडवूनही मुंबईला ‘ब’ गटात तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले.

बंगालने (५ सामन्यांत १६ गुण) कर्नाटकला पराभवाचा धक्का देत अग्रस्थानासह उपांत्यपूर्व फेरी गाठली. कर्नाटकच्या नावावरही तितकेच गुण आहेत. मुंबईला मात्र पाच सामन्यांत १२ गुणच मिळवता आले. मुंबईला कर्नाटकने नऊ, तर छत्तीसगडने एका धावेच्या फरकाने नमवले होते. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी मुंबईला बाद फेरीत प्रवेश करता आला नाही.

बडोद्याविरुद्धच्या लढतीत पृथ्वी शॉ (८३) आणि कर्णधार अजिंक्य रहाणे (७१) यांनी १५१ धावांची सलामी दिल्याने मुंबईने २ बाद १९३ धावांचा डोंगर उभारला. रहाणेने एकंदर चौथे, तर गेल्या तीन लढतीत दुहेरी धावसंख्याही गाठू न शकणाऱ्या पृथ्वीने हंगामातील पहिलेच अर्धशतक साकारले.

प्रत्युत्तरात फिरकीपटू तनुष कोटियनने (४/१६) बडोद्याला २० षटकांत ९ बाद १११ धावांत रोखण्यात मोलाची भूमिका बजावली. मोहित अवस्थीने (२/२३) त्याला उत्तम साथ दिली. विष्णू सोलंकीने (२७) बडोद्यातर्फे कडवी झुंज दिली. परंतु कर्णधार कृणाल पंड्या (११), केदार देवधर (५) छाप पाडण्यात अपयशी ठरले. १६ नोव्हेंबरला उपउपांत्यपूर्व, तर १८ नोव्हेंबरला दिल्लीत उपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळवण्यात येतील.

संक्षिप्त धावफलक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई : २० षटकांत २ बाद १९३ (पृथ्वी शॉ ८३, अजिंक्य रहाणे ७१; अतित शेठ १/३२) विजयी वि. बडोदा : २० षटकांत ९ बाद १११ (विष्णू सोलंकी २७; तनुष कोटियन ४/१६, मोहित अवस्थी २/२३)