सातत्यपूर्ण खेळाच्या जोरावर नामधारी इलेव्हनने लागोपाठ चौथा विजय नोंदविला आणि वरिष्ठ राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. त्यांनी राजस्तानला ३-१ असे हरविले.  मेजर ध्यानचंद स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत नामधारी संघाने साखळी गटात अव्वल स्थान घेतले. त्यांच्याविरुद्ध राजस्तान संघाने सैफ अली खान याच्या गोलद्वारे २९ व्या मिनिटाला आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर नामधारी संघाने वर्चस्व गाजविले. ३५ व्या मिनिटाला त्यांच्या संतासिंग याने पेनल्टी स्ट्रोकद्वारा गोल करीत बरोबरी साधली. उत्तरार्धात सामन्याच्या ४२ व्या मिनिटाला भगतसिंग याने पेनल्टी कॉर्नरद्वारा गोल करीत नामधारी संघास आघाडी मिळवून दिली. ६५ व्या मिनिटाला संतासिंग याने आणखी एक गोल करीत संघास ३-१ अशी आघाडी मिळवून दिली.
अन्य लढतीत मुंबई संघास जम्मू व काश्मीर संघाने १-१ असे बरोबरीत रोखले. ५३ व्या मिनिटाला जम्मू संघाच्या अमरिंदरसिंग याने गोल करीत संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र त्यांचा हा आनंद फार वेळ टिकला नाही. ६३ व्या मिनिटाला मुंबईच्या कुलदीपसिंग याने गोल करीत पराभव टाळला.