Namibia Beat South Africa in T20I: टी-२० क्रिकेट इतिहासात मोठा अपसेट पाहायला मिळत आहे. नामिबिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये पहिलाच टी-२० सामना खेळवला गेला आणि या सामन्यात नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा दारूण पराभव केला आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्यांदाच कोणत्याही असोसिएट संघाविरूद्ध पराभूत झाला आहे. नामिबियाचा संघ हा पूर्ण वेळ क्रिकेट खेळणाऱ्या राष्ट्रांचाही भाग नाही आहे. दक्षिण आफ्रिकेला एकमेव टी-२० सामन्यात पराभूत केल्यानंतर स्टेडियममधील चाहत्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता.
दक्षिण आफ्रिकेसाठी नामिबियाविरूद्धचा पहिला टी-२० संघ एक काळा दिवस म्हणून कायमच लक्षात राहिल. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला नामिबियाविरूद्ध एकमेव टी-२० सामन्यात ४ विकेट्सने पराभव पत्करावा लागला आहे.
दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ गडी गमावून १३४ धावा केल्या, त्यानंतर नामिबिया संघाने २० षटकांत ६ गडी गमावून अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला. नामिबियासाठी हा ऐतिहासिक विजय आहे, कारण संघ घरच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी पहिल्यांदाच मैदानावर उतरला होता.
नामिबिया क्रिकेट संघाने रचला इतिहास
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा असोसिएट देशाविरुद्धचा हा पहिलाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील पराभव आहे.तर नामिबियाने चौथ्यांदा पूर्ण सदस्य असलेल्या संघाला पराभूत केलं आहे, यापूर्वी त्यांनी आयर्लंड, झिम्बाब्वे आणि श्रीलंकेला पराभवाचं पाणी पाजलं होतं. नामिबियाने आपल्या घरच्या मैदानावर टी-२० विश्वचषक उपविजेत्या संघावर विजय मिळवलेला पाहता सर्वांनीच उभं राहून टाळ्या वाजवत एकच जल्लोष केला. चाहते स्टेडियममध्ये नाचताना दिसले, ज्याचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
नामिबियाच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ४ विकेट्सने विजयात यष्टीरक्षक-फलंदाज झेन ग्रीनने महत्त्वाची भूमिका बजावली, २३ चेंडूत नाबाद ३० धावा करत अखेर संघाला विजय मिळवून दिला. याशिवाय कर्णधार जेरार्ड इरास्मसने २१ चेंडूत २१ धावांची खेळीही केली.
लहान डे प्रिटोरियसने २२ तर रूबिन हेरमान याने २३ धावांची खेळी केली, तर जे स्मिथने सर्वाधिक ३१ धावांची खेळी केली. याशिवाय आफ्रिकेचे इतर सर्व फलंदाज नामिबियाच्या गोलंदाजीसमोर फेल ठरले. नामिबियाच्या गोलंदाजांची कामगिरी सर्वोत्तम होती, ज्यामध्ये त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना फार वेळ मैदानावर टिकण्याची कोणतीही संधी दिली नाही. ट्रम्पेलमनने तीन, मॅक्स हींगोने दोन आणि कर्णधार जेरार्ड, स्मिथ आणि बेन शिकोंगोने प्रत्येकी एक विकेट घेतली.
आयसीसी टी-२० क्रमवारीत १६ व्या क्रमांकावर असलेल्या नामिबियाच्या संघासाठी हा एक मोठा विजय आहे. याचबरोबर आगामी टी-२० विश्वचषक २०२६ साठी नामिबियाच्या संघ पात्र ठरला आहे. त्यामुळे या कामगिरीनंतर मनोबल उंचावलेला संघ अजून कोणता अपसेट घडवणार यावर सर्वांच्या नजरा असतील.
