भुवनेश्वर : उत्तर प्रदेशच्या कार्तिक कुमारने गुरुवारी १० हजार मीटर शर्यतीत आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत कार्तिकने सुवर्णपदकाची कमाई केली.

कार्तिकने २९ मिनिटे ०१.८४ सेकंद वेळ देत सोनेरी यश मिळवले. या वेळेसह त्याने आशियाई पात्रता सिद्ध केली. भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने आशियाई पात्रतेसाठी २९ मिनिटे ३० सेकंद ही पात्रता वेळ निश्चित केली होती. कार्तिक आशियाई स्पर्धेतून वरिष्ठ गटात आंतरराष्ट्रीय पदार्पण करेल. 

राष्ट्रीय स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी याच स्पर्धा प्रकारात पहिल्या चार क्रमांकाच्या धावपटूंनी आशियाई पात्रता वेळ पार केली. दुसरा क्रमांक मिळवणाऱ्या गुलवीर सिंगने २९ मिनिटे ०३.७८ सेकंद, तिसऱ्या क्रमांकावरील प्रीतम कुमारने २९ मिनिटे २२.३६ सेकंद, तर चौथ्या क्रमांकावरील हरमनज्योत सिंगने २९ मिनिटे २६.८६ सेकंद अशी वेळ दिली.

महिलांमध्ये या स्पर्धा प्रकारात महाराष्ट्राच्या संजीवनी जाधवने सुवर्णपदक पटकावले, पण ती आशियाई पात्रता वेळ देऊ शकली नाही. अमेरिकेत काही दिवसांपूर्वी ३२ मिनिटे ४६.८८ सेकंद अशी सरस वेळ देणाऱ्या संजीवनीने राष्ट्रीय स्पर्धेत ३४ मिनिटे ३४.१० सेकंद अशी वेळ दिली. मात्र, अ‍ॅथलेटिक्स महासंघाने दिलेल्या ३२ मिनिटे ३०.२४ सेकंद या वेळेपासून ती दूर राहिली. 

पहिल्या दिवशी २० किमी चालण्याच्या शर्यतीतही एकही खेळाडू आशियाई पात्रता सिद्ध करू शकला नाही. संदीप कुमारने पुरुष विभागातून, तर भावनाने महिला विभागात सुवर्णपदक जिंकले.