जागा बेकायदेशीर असल्याचा न्यायालयाचा निकाल

राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) बंगळुरू येथून बाहेर नेण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) प्रयत्नशील आहे. या अकादमीसाठी लागणाऱ्या जागेसाठी बीसीसीआय राज्य संघटनांना पत्र पाठवणार आहे. उच्च न्यायालयाने ही जागा बेकादेशीर असल्याचे सांगितले आहे. याबाबतची याचिका २०१३मध्ये दाखल करण्यात आली होती. यामध्ये जागेच्या खरेदीचा व्यवहार योग्य पद्धतीने झाला नसल्याचे सांगण्यात आले होते. रविवारी एनसीएल मंडळाची बंगळुरू येथे बैठक झाली. यामध्ये अकादमीमध्ये अधिक चांगल्या सुविधा असायला हव्यात, यावर मंडळाच्या सदस्यांचे एकमत झाले.

‘बीसीसीआयचे सचिव अजय शिर्के राज्य संघटनांना एनसीएच्या जागेसाठी पत्र पाठवणार आहे. एनसीएसाठी ३०-४० एकर जागा लागणार असून या जागेसाठी राज्य सरकारची परवानगी असणे अनिवार्य असेल. अपेक्षेप्रमाणे जागा मिळाल्यास एनसीए योग्य ठिकाणी हलवण्यात येईल,’ असे एनसीए मंडळाचे अध्यक्ष निरंजन शाह यांनी सांगितले.

एनसीएसाठी बीसीसीआय बंगळुरूमध्येच जागा पाहत होती, पण एवढी मोठी जागा त्यांना मिळू शकली नाही. एनसीएसाठी २०१० साली बंगळुरू राज्य सरकारकडून ४९ एकर जागा ५० कोटी रुपयांना बीसीसीआयने विकत घेतली होती.

गेल्या महिन्यात बीसीसीआयचे संयुक्त सचिव अमिताभ चौधरी यांनी याप्रकरणी बीसीसीआयने आतापर्यंत बराच काळ वाया घालवला असल्याचे सांगितले होते. त्याचबरोबर बंगळुरू राज्य सरकारने ३० जूनपर्यंत जागा न दिल्यास एनसीए हलवावे लागणार असल्याचे सूतोवाच केले होते.

याबाबत शाह म्हणाले की, ‘बीसीसीआय एनसीएला जास्त जागा कशी मिळेल, याची वाट पाहत आहे. सध्याच्या घडीला एनसीएमध्ये अद्ययावत सुविधा नाहीत. त्यामुळे सध्याच्या घडीला आम्ही एनसीएसाठी मोठय़ा जागेच्या प्रतीक्षेत आहोत.’