नवी दिल्ली : ग्रेटर नॉयडामध्ये सात ते १३ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या उपकनिष्ठ (१५ वर्षांखालील) राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत एकूण ७००हून अधिक बॉक्सिंगपटू सहभागी होणार असल्याची माहिती भारतीय बॉक्सिंग महासंघाने (बीएफआय) गुरुवारी दिली.

या स्पर्धेत १५ वजनी गटात खेळाडू सहभाग नोंदवतील. हरियाणाच्या मुलींनी, तर चंडीगडच्या मुलांच्या गेल्या वेळी जेतेपद मिळवले होते. राष्ट्रीय उपकनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेपूर्वी या वर्षाच्या सुरुवातीला पुरुष, महिला आणि कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

बॉक्सिंगपटू जागतिक बॉक्सिंगच्या तांत्रिक नियमांनुसार सामने खेळतील. यामध्ये दीड मिनिटाच्या तीन फेऱ्या असतील आणि प्रत्येक फेरीदरम्यान एका मिनिटाची विश्रांती असेल. स्पर्धेत दहा गुणांच्या प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.