रॉटरडॅम : कर्णधार आणि अनुभवी मध्यरक्षक लुका मॉड्रिचने अतिरिक्त वेळेत पेनल्टीवर केलेल्या गोलच्या बळावर क्रोएशियाने नेदरलँड्सचा ४-२ असा पराभव करताना नेशन्स लीग फुटबॉलची अंतिम फेरी गाठली.

बुधवारी मध्यरात्री झालेल्या लढतीत ३७ वर्षीय मॉड्रिचची कामगिरी क्रोएशियासाठी निर्णायक ठरली. देशासाठी १६५वा सामना खेळणाऱ्या मॉड्रिचने एक गोल आणि एक गोलसाहाय्य केले. त्यामुळे सामन्यानंतर नेदरलँड्सचे प्रशिक्षक रोनाल्ड कुमन यांनाही मॉड्रिचचे कौतुक करावे लागले. ‘‘मी हे बोलणे कदाचित योग्य ठरणार नाही, पण काही वेळा प्रतिस्पर्धी संघात असा एखादा खेळाडू असतो, जो निर्णायक कामगिरी बजावतो. अशा खेळाडूचा खेळ पाहताना मलाही मजा येते,’’ असे कुमन म्हणाले.

मॉड्रिचच्या नेतृत्वाखालील क्रोएशिया संघाने २०१८च्या विश्वचषकात उपविजेतेपद पटकावले होते, तर गतवर्षी कतार येथे झालेल्या विश्वचषकात तिसरे स्थान मिळवले होते. आता मॉड्रिच आणि क्रोएशियाला नेशन्स लीगच्या जेतेपदाची संधी आहे.

नेदरलँड्स आणि क्रोएशिया यांच्यातील सामना चुरशीचा झाला. ३४व्या मिनिटाला डॉनयेल मालेनने केलेल्या गोलमुळे नेदरलँड्सने आघाडी मिळवली. मात्र, उत्तरार्धात आंद्रे क्रॅमरिच (५५व्या मिनिटाला) आणि मारियो पासालिच (७२व्या मि.) यांनी गोल करत क्रोएशियाला

२-१ अशी आघाडी मिळवून दिली. क्रोएशियाचा संघ नियमित वेळेतच सामना जिंकणार असे वाटत असतानाच ९० मिनिटांनंतरच्या भरपाई वेळेत नोआ लॅन्गने गोल करत नेदरलँड्सला २-२ अशी बरोबरी करून दिली. त्यामुळे ३० मिनिटांचा अतिरिक्त वेळेचा खेळ झाला. यात ९८व्या मिनिटाला ब्रुनो पेट्कोविच, तर ११६व्या मिनिटाला मॉड्रिचने गोल नोंदवत क्रोएशियाला विजय मिळवून दिला.