झिको यांची सेप ब्लाटर यांना विनंती
आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) निवडणूक नियमांमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे, अशी विनंती फुटबॉलपटू झिको यांनी फिफा अध्यक्ष स्लेप ब्लाटर यांना केली आहे.
ब्लाटर हे फेब्रुवारीत अध्यक्षपदावरुन निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी काम करण्याची झिको यांची इच्छा आहे. अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी किमान पाच देशांच्या महासंघांचा पाठिंबा मिळण्याची आवश्यकता आहे. झिको यांनी सांगितले,‘‘आमच्या देशाच्या महासंघावर कॉन्फेडरेशनचे दडपण आहे. त्यामुळे कोणास पाठिंबा द्यायचा याचे स्वातंत्र्य आमच्या महासंघास नाही, हे लक्षात घेऊनच मी निवडणुकांच्या नियमावलीत बदल करण्याची मागणी केली आहे. खुद्द ब्लाटर हेदेखील सध्याच्या नियमावलीबाबत समाधानी नाहीत. सध्याच्या नियमावलीत मी बसत नसल्यामुळे मला निवडणुकीस उभे राहता येणे कठीण आहे. ब्लाटर यांनी नियमावलीत बदल करण्याबाबत तयारी दर्शविली आहे.
झिको यांना फक्त ब्राझीलच्या महासंघाचा पाठिंबा आहे. २६ ऑक्टोबरपूर्वी उमेदवारी जाहीर करायची असून तोपर्यंत आणखी चार देशांचा पाठिंबा मिळविण्याचे आव्हान झिको यांच्यावर आहे. त्यांना टर्की व जपान यांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. टर्की महासंघाच्या अध्यक्षांबरोबर झिको यांची सविस्तर चर्चा झाली होती. झिको यांना पाठिंबा देण्यासाठी टर्की उत्सुक असले तरी युरोपियन महासंघाच्या दबावाखाली त्यांचा झिको यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता कमी आहे.
ब्लाटर व झिको यांच्यातील भेट ही वैयक्तिक स्वरुपाची होती. झिको यांनी केलेल्या विनंतीनुसारच ही भेट आयोजित केली होती, त्याचा अध्यक्षपदाच्या निवडणुकीशी काहीही संबंध नाही असे फिफाने एका पत्रकाद्वारे कळविले आहे.