नवी दिल्ली : कसोटी क्रिकेट सामना किती दिवसात संपतो यावर चर्चा करत बसण्यापेक्षा कसोटी क्रिकेट कसे अधिक आकर्षक करता येईल याकडे लक्ष देण्याची वेळ आली असल्याचे मत भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे.
सचिनने एका खाजगी कार्यक्रमात बोलताना क्रिकेटविषयी आपली मते स्पष्टपणे मांडली. सचिन म्हणाला, ‘‘अलीकडे एकदिवसीय क्रिकेटही निरस व्हायला लागले आहे. यामध्ये काही बदल करण्यास काहीच हरकत नाही.’’ सचिनने कसोटी क्रिकेट सामना किती दिवसांत संपतो या चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही असे म्हटले आहे. ‘‘वेगवेगळय़ा खेळपटय़ांवर खेळणे हेच तर क्रिकेट आहे. मग ते किती दिवसांत संपते हे महत्त्वाचे नाही. वेगवेगळय़ा खेळपट्टय़ांशी जुळवून घेणे हे क्रिकेटपटूच्या हातात असते. म्हणूनच चर्चा करण्यापेक्षा कसोटी क्रिकेट अधिक आकर्षक कसे करता येईल याचा विचार होण्याची गरज आहे,’’ असे सचिनने सांगितले.
‘‘एखादा संघ जेव्हा विदेशी दौऱ्यावर असतो, तेव्हा तुम्हाला तेथील परिस्थितीशी जुळवून घेणे आवश्यक असते. परदेशात गेल्यावर तेथील हवामानापासून ते खेळण्याच्या वातावरणाचे मूल्यांकन करून त्यानुसार नियोजन करणे आवश्यक आहे. खेळपट्टी कुठली हा भाग यामध्ये गौण आहे. कसोटी क्रिकेट हे क्रिकेटचे हृदय आहे आणि ते आपण खेळत आहोत हे सर्वात महत्त्वाचे आहे,’’ असेही सचिन म्हणाला.
सध्याचे एकदिवसीय क्रिकेट निरस होत आहे. दोन नवे चेंडू वापरण्याबाबत फेरविचार करण्याची गरज आहे. त्याचवेळी ५० षटकांचे सामने दोन डावांत म्हणजे २५-२५ षटकांमध्ये खेळवले जाऊ शकतात. दोन्ही संघांना दोन्ही सत्रात गोलंदाजी करण्याची संधी मिळू शकते.
