चोरझोव : ऑलिम्पिक विजेत्या नीरज चोप्राचे ९० मीटर अंतर पार करण्याचे ध्येय गेल्या आठवड्यात दोहा डायमंड लीगमध्ये साध्य झाले. मात्र, नीरजच्या (९०.२३ मीटर) तुलनेत जर्मनीच्या ज्युलियन वेबरने (९१.०६ मीटर) सरस कामगिरी करताना जेतेपद पटकावले. आता हे दोन आघाडीचे भालाफेकपटू आज, शुक्रवारी पोलंड येथील ओर्लिन जानुझ कुसोसिन्स्की स्मृती स्पर्धेत आमनेसामने येणार असून त्यांचा कामगिरी आणखी उंचाविण्याचा प्रयत्न असेल.
नीरज आणि वेबरसमोर ग्रेनाडाचा दोन वेळचा जगज्जेता अँडरसर्न पीटर्सचे आव्हान असेल. पीटर्सची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ९३.०७ मीटर अशी आहे. मात्र, दोहामध्ये त्याला केवळ ८४ मीटरचे अंतर गाठता आले. त्यामुळे तो तिसऱ्या स्थानी राहिला होता. आता कामगिरीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने तो मैदानात उतरेल.
नीरज, वेबर, पीटर्स यांच्यासह पोलंडचा राष्ट्रीय विक्रमवीर मार्चिन क्रुकोव्स्की (वैयक्तिक सर्वोत्तम ८९.५५ मीटर), पोलंडचेच सायप्रियन मर्झिग्लोड (८४.९७ मीटर) आणि डेव्हिड वेगनर (८२.२१ मीटर), तसेच मोल्दोवाचा अॅड्रियन मारडारे (८६.६६ मीटर) व युक्रेनचा आर्थर फेल्फनर (८४.३२ मीटर) यांचाही स्पर्धेत सहभाग असेल.