भुवनेश्वर : ऑलिम्पिक आणि जागतिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा, तसेच किशोर जेना यांना फेडरेशन चषक अॅथलेटिक्स स्पर्धेतील भालाफेक प्रकाराच्या थेट अंतिम फेरीत प्रवेश देण्यात आला आहे. अंतिम फेरीसाठी ७५ मीटर अंतराचा पात्रता निकष ठेवण्यात आला असून नीरज आणि किशोर यांनी कारकीर्दीत अनेकदा हे अंतर पार केले आहे. भालाफेकीची पात्रता फेरी मंगळवारी (आज), तर अंतिम फेरी बुधवारी होईल.

नीरजने नुकत्याच झालेल्या दोहा डायमंड लीगमध्ये सहभाग नोंदवला होता. यंदाच्या हंगामातील पहिलीच स्पर्धा खेळताना नीरजने ८८.३८ मीटर अंतरावर भाला फेकत दुसरा क्रमांक मिळवला होता. विजेत्या याकुब वाडलेजच्या अंतरापासून तो केवळ दोन सेंटीमीटर दूर राहिला होता. आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या किशोर जेनाचे डायलंड लीगमधील पदार्पण निराशाजनक ठरले होते. तिसऱ्या प्रयत्नानंतरच त्याचे आव्हान संपुष्टात आले. त्याला ७६.३१ मीटरचेच अंतर गाठता आले होते. आता फेडरेशन चषकात नीरजसमोर आव्हान उपस्थित करण्याचा किशोरचा प्रयत्न असेल.

हेही वाचा >>> IPL 2024 : ‘विराटला पुढील हंगामात कर्णधार बनवण्याचा विचार करावा…’, माजी खेळाडूचा आरसीबीला सल्ला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या वर्षीच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहाव्या क्रमांकावर राहिलेल्या डीपी मनूलाही फेडरेशन चषकाच्या थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळाला आहे. या स्पर्धेत ८५.५० मीटरचे अंतर पार करत पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवण्याचा मनूचा प्रयत्न असेल. ‘‘ज्या भालाफेकपटूंनी कारकीर्दीत ७५ मीटरचे अंतर पार केले आहे, त्यांना फेडरेशन चषकात थेट अंतिम फेरीत प्रवेश देण्यात आला आहे. भालाफेकीसाठी नाव नोंदवलेल्यांपैकी नऊ जणांनी हे अंतर यापूर्वी पार केले असून यात नीरज आणि किशोर जेना यांचा समावेश आहे. ते थेट बुधवारी अंतिम फेरीत खेळतील,’’ असे भारतीय अॅथलेटिक्सचे मुख्य प्रशिक्षक राधाकृष्णन नायर यांनी सांगितले. पात्रता फेरीतील अव्वल तीन नेमबाज अंतिम फेरीत स्थान मिळवतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.