क्रीडाविश्वातला ऑस्कर अशी ओळख असलेल्या लॉरियस पुरस्काराबाबत महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. टोक्यो ऑलिम्पिमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकलेला भालाफेकपटू नीरज चोप्राला ‘लॉरियस वर्ल्ड ब्रेकथ्रू ऑफ द इयर’ या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. हे नामांकन मिळवणारा नीरज तिसरा भारती ठरला. यापूर्वी २०१९मध्ये कुस्तीपटू विनेश फोगाट आणि २०२२मध्ये सचिन तेंडुलकरला हे नामांकन मिळाले होते. सचिन लॉरियस क्रीडा पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला होता.

नीरजने ऑलिम्पिकमध्ये अंतिम स्पर्धेत ८७.५८ मीटर भाला फेकत ट्रॅक अँड फील्डमध्ये देशासाठी पहिले पदक जिंकले होते. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा भारताचा दुसरा खेळाडू आहे. त्याच्या आधी नेमबाज अभिनव बिंद्राने २००८च्या बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते. “या पुरस्कारासाठी नामांकन मिळाल्याने मला खूप आनंद होत आहे. टोक्योमध्ये मी जे काही साध्य केले, त्याची क्रीडाविश्वात अशी ओळख होणे, ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे”, असे नीरजने म्हटले. नीरजला पद्मश्री पुरस्कारही जाहीर झाला आहे. त्याआधी नीरजला परम विशिष्ट सेवा पदक देण्याची घोषणा करण्यात आली. 

लॉरियस क्रीडा पुरस्काराबाबत…

१९९९मध्ये स्पोर्ट्स फॉर गुड फाऊंडेशनच्या डेमलर आणि रिचमाउंट यांनी या पुरस्काराची सुरुवात केली होती. खेळाच्या माध्यमातून जगातील हिंसा, भेदभाव संपवणे आणि खेळामध्ये जग बदलण्याची ताकद आहे हे सिद्ध करणे हे या फाउंडेशनचे ध्येय आहे. लॉरियस हा शब्द लॉरेल या ग्रीक शब्दापासून आला आहे. त्याचा अर्थ अॅथलेटिक्स स्पर्धेतील विजयी मुद्रा दर्शवतो.

हेही वाचा – VIDEO : ना चौकार, ना षटकार..! शेवटच्या चेंडूवर हवे होते ५ रन; मग फलंदाजांनी ‘अशी’ जिंकवली मॅच!

२५ मे २००० रोजी मॉन्टे कार्लो येथे प्रथमच हा पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात दक्षिण आफ्रिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांनी व्याख्यान दिले होते. २०१९ पासून हे पुरस्कार आठ श्रेणींमध्ये संघ आणि वैयक्तिक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दिले जातात. यामध्ये लॉरियसचा पुतळा बक्षीस म्हणून दिला जातो.

सचिनने मिळवलाय हा बहुमान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला हा पुरस्कार मिळाला आहे. २०११च्या विश्वचषकाच्या एका खास क्षणासाठी त्याला हा पुरस्कार मिळाला. विश्वचषक जिंकल्यानंतर सचिनला त्याच्या सहकाऱ्यांनी खांद्यावर घेऊन वानखेडे स्टेडियमभोवती फेरी मारली होती. २०००-२०२० या काळातील हा सर्वोत्तम क्रीडा क्षण मानला गेला. सचिनशी संबंधित या क्षणाला ‘कॅरीड ऑन द शोल्डर्स ऑफ अ नेशन’ असे शीर्षक देण्यात आले होते.