पीटीआय, दोहा

Doha Diamond League वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केल्यानंतरही ९० मीटर अंतराच्या स्वप्नापासून दूर राहणाऱ्या भारताचा भालाफेक खेळाडू नीरज चोप्राने ही स्वप्नपूर्ती केल्यानंतर आता याहून अधिक सरस कामगिरीचे उद्दिष्ट ठेवले आहे.डायमंड लीगच्या दोहा येथील टप्प्यात नीरजने शुक्रवारी ९०.२३ मीटर भालाफेक करत आपले गेल्या काही वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण केले. अर्थात, त्यानंतरही ज्युलियन वेबरच्या ९१.०६ मीटरच्या फेकीमुळे नीरजला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या कामगिरीनंतर नीरजने आता याहून अधिक अंतर गाठण्याचे लक्ष्य साधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत, गेली काही वर्षे सतावणाऱ्या कंबरेच्या दुखापतीच्या त्रासातून कमी अधिक प्रमाणात मुक्त झालो आहे. कारकीर्दीत ९० मीटरच्या कामगिरीने आनंदी आहे. पहिल्या क्रमांकापासून वंचित राहिल्यामुळे या कामगिरीचा आनंद पूर्ण गोड होऊ शकला नाही. पण काही हरकत नाही. मी आणि प्रशिक्षक झेलेझ्नी माझ्या शैलीत अधिक सुधारणा करण्यावर काम करत आहोत,’’ असे नीरज म्हणाला.

‘‘या वर्षी फेब्रुवारीमध्येच झेलेझ्नी यांच्याबरोबर काम करायला सुरुवात केली. अजूनही मी शिकतच आहे. कामगिरीत अजूनही परिपूर्णता आणायची आहे,’’ असेही नीरजने सांगितले. भालाफेकीमधील ९८.४८ मीटरचा जागतिक विक्रम झेलेझ्नी यांच्याच नावावर अद्याप आबाधित आहे.‘‘गेली काही वर्षे मला कंबरेच्या दुखापतीने सतावले आहे. त्यातून आता कुठे बाहेर पडत आहे. कमी अधिक प्रमाणात वेदना होतच आहेत. त्यामुळे सर्वोत्तम प्रयत्न केला नाही. माझ्या शैलीवर आम्ही अजूनही काम करत आहोत. त्यामुळे या वर्षी होणाऱ्या आगामी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेपर्यंत ९० मीटरपेक्षा अधिक लांब भालाफेक करू शकेन,’’ असा विश्वासही नीरजने या वेळी व्यक्त केला.

स्पर्धेच्या ठिकाणी वाऱ्याचा प्रवाह चांगला होता. त्यामुळे सरावावेळी प्रशिक्षक झेलेझ्नी यांनी ९० मीटरचे लक्ष्य शक्य असल्याची कल्पना दिली. हवामान थोडे उबदार होते. त्याचाही फायदा झाला, असेही नीरजने स्पष्ट केले.आम्ही एकमेकांपेक्षा सरस कामगिरी करण्यासाठी सतत एकमेकांना प्रेरणा देत असतो. वेबरने चांगली कामगिरी केली. आमच्यात आता ही स्पर्धा अशीच रंगत जाईल, अशा शब्दात नीरजने वेबरच्या कामगिरीचे कौतुक केले.वेबरनेही नीरजच्या कामगिरीचे कौतुक केले. कसे घडले माहीत नाही. पण, आम्ही दोघांनी ९० मीटरचा टप्पा ओलांडला. बऱ्याच वर्षापासून आम्ही या कामगिरीसाठी आसुसलेले होतो. एकाच स्पर्धेत आम्ही दोघांनी ते साध्य केले. आमच्यासाठी ही स्पर्धा खूप खास राहील, असे वेबर म्हणाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही एका दीर्घ हंगामाची सुरुवात आहे. स्पर्धाही वाढली आहे. आता ९० मीटरमध्ये सातत्य राखणे आणि त्यापेक्षा अधिक फेक करणे हे उद्दिष्ट असेल. – नीरज चोप्रा