Neeraj Chopra Throws Historic 90-M Mark Video: क्रिकेटवीरांसाठी शतकापूर्वीचा नर्व्हस नाईन्टीचा काळ अतिशय कठीण मानला जातो. ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रासाठी नव्वद मीटर अंतरावरचा थ्रो अप्राप्य ठरत होता. शुक्रवारी दोहा इथे झालेल्या स्पर्धेत नीरजने दिमाखात नव्वदीपार थ्रो करत कारकिर्दीत मानाचा तुरा खोवला.
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने दोहा डायमंड लीगमध्ये ही ऐतिहासिक कामगिरी केली. गोल्डन बॉय नीरज चोप्राने अखेरीस प्रतिक्षा संपवत ९० मी. लांब भाला फेकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे करत दिग्गजांच्या मांदियाळीत आपलं स्थान पटकावलं. नीरज चोप्राने दोहा डायमंड लीगमध्ये ९० मी. पेक्षा लांब भाला फेकत त्याचा सर्वाेत्कृष्ट आकडा गाठला. नीरजने तिसऱ्या प्रयत्नात ९०.२३ मी. भाला फेकला. यासह तो जगातील २५वा भालाफेकपटू ठरला आहे, ज्याने ९० मी. भाला फेकण्याचा टप्पा गाठला.
डायमंड लीगमधील पहिल्या थ्रोपासून नीरज चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. त्याने पहिल्याच प्रयत्नात ८८.४४ मी. टप्पा गाठला. तर दुसरा थ्रो फाऊल ठरला. पण तिसऱ्या प्रयत्नात त्याने ९० मीटरचा टप्पा ओलांडून ही कामगिरी केली. नीरजचा यापूर्वी बेस्ट थ्रो ८९.९४ मी. होता.
पुरुषांच्या भालाफेकीत नीरज आता जागतिक आघाडीच्या गुणतालिकेत २३ व्या स्थानावर आहे. जर्मनीचा मॅक्स डेहनिंग ९०.२० च्या गुणांसह आणि त्रिनिदाद आणि टोबॅगोचा केहरॉन वॉलकॉट ९०.१६ च्या गुणांसह ९० अधिक मीटरच्या यादीत चोप्राच्या मागे आहेत. चोप्राचे प्रशिक्षक चेक प्रजासत्ताकचे जान झेलेन्झनी १९९६ मध्ये ९८.४८ मीटरच्या विश्वविक्रमासह जागतिक गुणतालिकेत आघाडीवर आहेत.
जगात ९० मीटरपेक्षा लांब भालाफेक करणाऱ्या २५ भालाफेकपटूंपैकी सहा जर्मनीचे, चार फिनलँडचे, दोन चेक प्रजासत्ताकचे, ग्रेनाडा, पाकिस्तान, केनिया, रशिया, ग्रीस, नॉर्वे, ग्रेट ब्रिटन, चायनीज ताइपेई, अमेरिका, लाटविया, एस्टोनिया आणि त्रिनिदाद आणि टोबॅगोचे प्रत्येकी १-१ भालाफेकपटू आहेत, तर नीरज चोप्रा भारतातील एकमेव आहे.
दोहा डायमंड लीग स्पर्धा कोणी जिंकली?
नीरज चोप्रा ९०.२३ मी. च्या भालाफेकनंतर डायमंड लीग स्पर्धा जिंकण्यासाठी आघाडीवर होता. पण आपल्या अखेरच्या प्रयत्नात चॅम्पियन खेळाडू ज्युलियन वेबरने ९१ मी. भालाफेक करत नीरज चोप्राच्या ९० मी. आकड्याला धक्का देत यंदाच्या डायमंड लीग स्पर्धेचा विजेता ठरला. तर नीरजला दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले.