आमच्या देशातील लोक भूकंपाच्या धक्क्यातून अद्याप सावरलेले नाहीत. मात्र दुभंगलेल्या मानसिक धक्क्यातून आम्ही नेपाळ क्रिकेटला सावरण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे नेपाळ क्रिकेट संघाचा कर्णधार पारस खाडका याने सांगितले.

आगामी जागतिक ट्वेन्टी-२० पात्रता फेरीत नेपाळला आर्यलड व स्कॉटलंड यांच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. या सामन्यांसाठी नेपाळच्या संघाचे सराव शिबिर धरमशाळा येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर आयोजित करण्यात आले आहे. नेपाळ संघात २२ खेळाडूंचा समावेश आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नेपाळच्या संघास सराव करण्यासाठी परवानगी दिली आहे. प्रथमच या देशाचे सराव शिबिर आपल्या देशात होत आहे.

खाडका याने पुढे सांगितले, ‘‘भूकंपामुळे झालेल्या हानीतून आम्ही अद्याप सावरू शकलो नाहीत. मात्र आम्हाला या सामन्यांसाठी शारीरिक व मानसिकदृष्टय़ा तयारी करण्याची आवश्यकता आहे. आम्ही येथे दोन आठवडे तयारीसाठी आलो आहोत. येथील सरावाचा आम्हाला खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावण्यासाठी खूप फायदा होणार आहे. कारण जर आम्ही आमच्या देशातच सराव करीत राहिलो असतो, तर सतत भूकंपाचे विदारक चित्रच आमच्या डोळ्यासमोर उभे राहिले असते.’’

भारतीय क्रिकेट मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानत खाडका याने सांगितले, ‘‘भारतामधील अन्य शहरांपेक्षा येथील वातावरण अतिशय चांगले आहे. त्यामुळे मायदेशी परतण्यापूर्वी आमचे मनोधैर्य उंचावलेले असेल. येथील सुविधा अतिशय अव्वल दर्जाच्या आहेत. त्याचा अधिकाधिक फायदा घेत भक्कम संघबांधणीवर आमचा भर राहील. भूकंपानंतर झालेल्या अपरिमित हानी भरून काढणे शक्य नव्हते तरीही आम्ही परदेशातील नेपाळी लोकांना केलेल्या आवाहनास खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. भूकंपाच्या वेळी मी ऑस्ट्रेलियात होतो. तेथे मी केलेल्या आवाहनानंतर तीस हजार अमेरिकन डॉलर्सचा निधी उभा करू शकलो. त्याचा उपयोग भूकंपग्रस्त लोकांसाठी केला जाणार आहे.’’