दररोज एकसारखेच जेवण समोर आले की जेवणाचा कंटाळा येतो. पण त्याच जेवणाला खमंग फोडणी दिली आणि ताटात पापड-लोणचे-कोशिंबीर वाढली की तेच जेवण जेवायला मजाही येते आणि पोटभर जेवताही येते. तात्पर्य, मनुष्याला बदलांची गरज असते. खेळांच्या बाबतीतही तसेच आहे. कसोटी क्रिकेटला पर्याय म्हणून एकदिवसीय क्रिकेटचा जन्म झाला. आता एकदिवसीय क्रिकेटही कालबाह्य़ झाले आहे. एकदिवसीय क्रिकेटची जागा आता ट्वेन्टी-२० क्रिकेटने घेतली आहे. झटपट, वेगवान आणि आधुनिक वाटणाऱ्या या युगात ट्वेन्टी-२० क्रिकेटने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली. हॉकीमध्येही आता बदलाचे वारे घोंघावू लागले आहेत. रटाळ वाटणाऱ्या हॉकी खेळाला आता चार सत्रांची खमंग फोडणी देण्यात आली आहे.
नैसर्गिक हिरवळीवर खेळवली जाणारी हॉकी १९८०च्या दशकात कृत्रिम टर्फवर खेळवण्यात येऊ लागली. दुर्दैवाने त्यानंतर भारतीय हॉकीची कामगिरीही खालावत गेली. त्यानंतर हॉकी खेळात छोटे-मोठे बदल करण्यात आले. २०१२च्या लंडन ऑलिम्पिकसाठी हिरव्या रंगाच्या टर्फऐवजी निळ्या रंगाचे टर्फ वापरण्यात आले, तसेच पांढऱ्या चेंडूऐवजी पिवळ्या रंगाचे चेंडू वापरण्याचा प्रयोग करण्यात आला. पण एकूणच लोकांच्या पसंतीतून उतरलेला हॉकी हा खेळ अखेरच्या घटका मोजू लागला आहे. ऑलिम्पिकमधूनही हा खेळ हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. गेल्या वर्षी कुस्ती या खेळाला २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमधून वगळण्यात आले होते. नशिबाने हॉकी खेळावर ही परिस्थिती आली नाही. अखेर नियमांमध्ये बदल करण्यात आल्यानंतर कुस्ती या खेळाला पुन्हा ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळाले. आता प्रेक्षकांची रोडावलेली संख्या आणि हॉकीचे जुने स्वरूप यामुळे हॉकी या खेळावर ऑलिम्पिकमधून डच्चू मिळण्याची टांगती तलवार आहे. त्यामुळे हॉकी खेळाला कालानुरूप नवी झळाळी देण्याची आवश्यकता होतीच. त्यामुळेच प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी तसेच जाहिरातदारांना आकर्षित करण्यासाठी हॉकी या खेळात आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत.
एरव्ही ३५ मिनिटांच्या दोन सत्रात ७० मिनिटांपर्यंत होणारा हॉकीचा सामना आता ६० मिनिटांवर आला आहे. १५ मिनिटांच्या चार सत्रात तो खेळवला जाणार आहे. त्याचबरोबर पेनल्टी-कॉर्नरसाठी आणि गोल झाल्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी प्रत्येकी ४० सेकंदांचा टाइम-आऊट ठेवण्यात आला आहे. १ सप्टेंबरपासून हे नियम लागू होणार आहेत. त्यामुळे चॅम्पियन्स चषक, हॉकी जागतिक लीग आणि २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये या नव्या नियमांचा कस लागणार आहे. या नव्या नियमांचा खेळावर चांगलाच प्रभाव पडेल, अशी चिन्हे आहेत. सामन्याचा कालावधी १० मिनिटांनी कमी करण्यात आला असला तरी पहिल्या आणि तिसऱ्या सत्रात मिळणारी दोन मिनिटांची विश्रांती तसेच पेनल्टी-कॉर्नर आणि गोल झाल्यानंतर मिळणारा ४० सेकंदांचा कालावधी यामुळे खेळ ७० मिनिटांच्या आसपास रंगणार आहे. सामन्यात मोजके पेनल्टी-कॉर्नर आणि कमी गोल झाल्यासही ६५ मिनिटांपेक्षा जास्त खेळ रंगणार आहे.
वारंवारच्या विश्रांतीमुळे खेळातील लय बिघडली जाण्याची भीती काहींनी व्यक्त केली असली तरी प्रत्येक सत्रानंतर मिळणाऱ्या दोन मिनिटांच्या विश्रांतीमुळे अव्वल खेळाडूंना विश्रांती घेण्याची जास्त संधी मिळणार आहे. त्यामुळे अव्वल खेळाडू जास्तीत जास्त वेळ मैदानावर खेळू शकतील. टाइम-आऊटमुळे खेळाडूंना तसेच प्रशिक्षकांना एकमेकांशी चर्चा करून रणनीतीत बदल करण्याची तसेच आपल्या चुका सुधारण्याची संधी मिळेल. त्यामुळे अधिक कौशल्यपूर्ण हॉकी पाहायला मिळेल. त्यामुळे खेळाचा दर्जाही उंचावत जाईल. पेनल्टी-कॉर्नरच्या ‘टाइम-आउट’दरम्यान खेळाडूंना कुठे उभे करायचे, हे प्रशिक्षकांना ठरवण्यासाठी वेळ मिळणार आहे. ४० सेकंदांच्या ‘टाइम-आउट’मुळे खेळाडूंना गोल झाल्यानंतर मनमोकळेपणाने जल्लोष करता येईल. विश्रांतीमुळे प्रेक्षकांनाही सामन्यादरम्यान झालेले गोल आणि निसटून गेलेले रंगतदार क्षण याचे चित्रण पुन्हा पाहण्याची संधी मिळेल.
मध्यंतरी आयपीएलदरम्यान करण्यात आलेला ‘स्ट्रॅटेजिक टाइम-आउट’चा प्रयोग यशस्वी ठरला होता. त्याच पावलावर पाऊल ठेवून आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघानेही ‘टाइम-आउट’दरम्यान जाहिराती दाखविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या विश्रांतीचा दुसरा फायदा म्हणजे समालोचकांना सामन्याचे विश्लेषण करण्यासाठी जास्त वेळ मिळणार आहे. जाहिराती दाखवण्यासाठी हक्काचा वेळ मिळणार असल्यामुळे हॉकी या खेळाकडे जाहिरातदार आणि पुरस्कर्तेही आकर्षित होतील. नव्या संरचनेमुळे प्रेक्षकसंख्या वाढण्यास मदत होणार आहे.
अनेक खेळ सध्या जाहिरातदारांची मागणी आणि चाहते यांच्यात समतोल साधण्यात अपयशी ठरत चालले आहेत. हॉकीतील नव्या नियमांमुळे जाहिरातदार आणि चाहत्यांना योग्य न्याय मिळणार आहे. खेळ जिवंत ठेवण्यासाठी जाहिरातदार आणि प्रेक्षक हे प्राणवायू समजले जातात. या दोन्ही आघाडय़ांवर झगडणाऱ्या हॉकी खेळाला या नव्या नियमांमुळे कितपत झळाळी मिळते, हे येणारा काळच ठरवणार आहे.