New Zealand-England Test Seriesवेलिंग्टन: पहिल्या डावात फॉलोआनची नामुष्की ओढवल्यानंतरही न्यूझीलंडने कमालीचा खेळ दाखवून दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडवर एका धावेने राखून रोमहर्षक विजय मिळविला. कसोटी क्रिकेटमध्ये फॉलोऑनच्या नामुष्कीनंतर विजय मिळविणारा न्यूझीलंड केवळ चौथाच संघ ठरला.
कसोटीत अनेक क्षण असे आले की दोन्ही संघांना त्या वेळी विजयाची समान संधी होती. सामन्याच्या अखेरच्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली, तेव्हा न्यूझीलंड सामना जिंकेल असे कुणीच सांगू शकत नव्हते. अखेरच्या दिवशी वॅगनरने चार गडी बाद करताना तीन झेल टिपत न्यूझीलंडच्या विजयात मोलाची कामगिरी केली.
इंग्लंडसाठी जो रूटने ९५ धावांची खेळी करताना कर्णधार बेन स्टोक्सच्या (३३) साथीत १२१ धावांची भागीदारी केली. पण, एका धावेच्या अंतराने दोन्ही फलंदाज बाद झाले. तेव्हा इंग्लंडला ५६ धावांची गरज होती आणि त्यांचे तीन गडी शिल्लक होते. येथे न्यूझीलंडला संधी निर्माण झाली. तेव्हा बेन फोक्सने ३५ धावांची खेळी करताना पुन्हा एकदा इंग्लंडच्या आशा पल्लवित केल्या. इंग्लंडला केवळ २ धावांची आवश्यकता होती. पण, वॅगनरच्या किंचित उसळी घेतलेल्या चेंडूने अँडरसनच्या बॅटची कड घेतली आणि ब्लंडेलने सुरेख झेल घेतला.