तब्बल १६ विकेट्सचा साक्षीदार ठरलेल्या न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंड विजयाच्या उंबरठय़ावर आहे. १८९ धावांचे लक्ष्य मिळालेल्या न्यूझीलंडच्या ५ बाद १४२ धावा झाल्या आहेत. विजयासाठी त्यांना ४७ धावांची आवश्यकता आहे. तत्पूर्वी ९ बाद २३२ वरून पुढे खेळणाऱ्या न्यूझीलंडचा पहिला डाव पाच धावांची भर घालून आटोपला. दुश्मंत चमीराने ५ बळी घेतले. श्रीलंकेला ५५ धावांची आघाडी मिळाली. या आघाडीचा फायदा घेत मोठी धावसंख्या उभारण्याचे श्रीलंकेचे इरादे न्यूझीलंडच्या भेदक गोलंदाजीसमोर निष्प्रभ ठरले. श्रीलंकेचा दुसरा डाव अवघ्या १३३ धावांतच आटोपला. कुशल मेंडिसने सर्वाधिक ४६ धावा केल्या. न्यूझीलंडतर्फे टीम साऊदीने ४ तर नील व्ॉगनरने ३ बळी घेतले. १८९ धावांचे माफक लक्ष्य मिळालेल्या न्यूझीलंडची अवस्था २ बाद ११ अशी झाली. मात्र केन विल्यमसनने संयमी खेळी करत डाव सावरला. ७ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ७८ धावा करत विल्यमसनने न्यूझीलंडला विजयासमीप नेले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 21st Dec 2015 रोजी प्रकाशित
श्रीलंकेविरुद्ध न्यूझीलंड विजयाच्या उंबरठय़ावर
केन विल्यमसनने संयमी खेळी करत डाव सावरला.

First published on: 21-12-2015 at 00:50 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New zealand on the victory stage against sri lanka