new zealand vs india 3rd odi match prediction india aim to draw series zws 70 | Loksatta

X

भारतीय संघाचे मालिका बरोबरीचे लक्ष्य!; न्यूझीलंडविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना आज

न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर मध्यक्रमाला स्थिरता देण्याची सूर्यकुमार आणि श्रेयस अय्यरसह पंतवरही जबाबदारी आहे.

भारतीय संघाचे मालिका बरोबरीचे लक्ष्य!; न्यूझीलंडविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना आज
शिखर धवन

ख्राइस्टचर्च : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा व अखेरचा एकदिवसीय सामना बुधवारी खेळवला जाणार असून यामध्ये पावसाचा व्यत्यय येणार नाही अशी संघांना आशा आहे.

ख्राइस्टचर्चमध्ये बुधवारी पावसाचा अंदाज असून, तसे झाल्यास भारताच्या युवा क्रिकेटपटूंसाठी ही बाब निराशाजनक असेल. उभय संघांतील मर्यादित षटकांच्या पाच सामन्यांपैकी एका एकदिवसीय आणि एका ट्वेन्टी-२० सामन्याचा निकाल पावसामुळे लागला नाही. एक ट्वेन्टी-२० सामना डकवर्थ-लुईस-स्टर्न नियामाच्या आधारे बरोबरीत राहिला होता.

पावसाने व्यत्यय आणला नाही आणि ठरल्याप्रमाणेच सामना झाल्यास, शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सामन्यात विजयासह मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. हॅगले ओव्हल मैदानात वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. ‘पॉवरप्ले’मधील भारतीय फलंदाजांची कामगिरी हा मालिकेतील चर्चेचा विषय राहिला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये यापूर्वी चांगली कामगिरी करणाऱ्या धवनलाही पुढील वर्षी भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या भारतीय संघात आपली जागा निश्चित करण्यासाठी खेळण्याच्या शैलीत बदल करावा लागणार आहे. युवा सलामीवीर शुभमन गिलने गेल्या दोन सामन्यांत अनुक्रमे ५० आणि नाबाद ४५ धावा केल्या. सूर्यकुमार यादवनेही आपल्या आक्रमक फलंदाजीने पुन्हा सर्वाचे लक्ष वेधले. भारताला मोठी धावसंख्या उभारण्यासाठी सूर्यकुमार आणि ऋषभ पंतसारख्या फलंदाजांचे योगदान महत्त्वाचे ठरेल.

पंतला इंग्लंड दौऱ्यानंतर फारशा धावा करता आलेल्या नाहीत. न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर मध्यक्रमाला स्थिरता देण्याची सूर्यकुमार आणि श्रेयस अय्यरसह पंतवरही जबाबदारी आहे. पंत खेळल्यास संजू सॅमसनला संघाबाहेर राहावे लागेल. गेल्या सामन्यात अष्टपैलू दीपक हुडाला सॅमसनऐवजी संघात स्थान मिळाले होते. फिरकी गोलंदाज कुलदीप यादवलाही अजून संधी मिळालेली नाही. शार्दूल ठाकूरला पहिल्या सामन्यात फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे वेगवान गोलंदाजीची जबाबदारी अर्शदीप सिंग, दीपक चहर आणि उमरान मलिक यांच्यावर असेल.

दुसरीकडे, न्यूझीलंडच्या फलंदाजीची भिस्त सलामीवीर डेव्हॉन कॉन्वे, कर्णधार केन विल्यम्सन आणि टॉम लॅथम यांच्यावर, तर गोलंदाजीची भिस्त मॅट हेन्री, टीम साउदी आणि लॉकी फग्र्युसन यांच्यावर असेल.

’ वेळ : सकाळी ७.०० वा.

’ थेट प्रक्षेपण : अ‍ॅमेझॉन प्राइम, डीडी स्पोर्ट्स

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 05:27 IST
Next Story
सुनेमुळे बीसीसीआय अध्यक्षांच्या अडचणीत वाढ; रॉजर बिन्नी यांना बजावली नोटीस