EaseMyTrip Pulled Out WCL: ईझ माय ट्रीप या स्टार्ट अपचे सह-संस्थापक निशांत पिट्टी यांनी नुकतेच जाहीर केले आहे की, त्यांच्या कंपनीचा सध्या सुरू असलेल्या लीगमधील बहुप्रतिक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान उपांत्य फेरीतील सामन्याशी कोणताही संबंध असणार नाही. ईझ माय ट्रीप या स्पर्धेची प्रायोजक आहे.
निशांत पिट्टी यांनी आज वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्ससंदर्भात एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये हा निर्णय जाहीर करत त्यांनी, “क्रिकेट आणि दहशतवाद एकत्र चालू शकत नाहीत”, असे म्हटले आहे.
दहशतवाद आणि क्रिकेट…
‘भारत विरुद्ध पाकिस्तान, वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स सेमीफायनल’ या शीर्षकाच्या पोस्टमध्ये निशांत पिट्टी यांनी लिहिले की, “वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्समध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आम्ही टीम इंडियाचे कौतुक करतो. तुमचा कामगिरीचा देशाला अभिमान वाटतो. पण पाकिस्तान विरुद्धचा आगामी सेमीफायनल सामना हा फक्त एक सामना नाही. दहशतवाद आणि क्रिकेट हातात हात घालून चालू शकत नाहीत.”
दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशाशी…
ते पुढे म्हणाले की, “आम्ही (ईझ माय ट्रीप) भारताच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशाशी संबंध सामान्य करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाचे आम्ही समर्थन करू शकत नाही. भारतातील लोकांची भावना आम्ही ऐकतो. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्समधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याशी ईझ माय ट्रीपचा कसलाही संबंध असणार नाही. काही गोष्टी खेळापेक्षा मोठ्या असतात. देश आधी आणि व्यवसाय नंतर.”
ईझ माय ट्रीपची राष्ट्रवादी भूमिका
ईझ माय ट्रीप ही कंपनी वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स स्पर्धेच्या प्रायोजकांपैकी एक होती. या स्पर्धेच्या प्रचारासाठी ईझ माय ट्रीप ब्रँडिंग आणि डिजिटल प्रमोशन्सच्या माध्यमातून सहभागी होती. मात्र, भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि भारतातील काही भागांमध्ये पाकिस्तानविरोधी भावना, विशेषतः क्रीडा क्षेत्रातील सहभाग टाळण्याच्या मागण्या वाढू लागल्यानंतर, निशांत पिट्टी यांचा निर्णय हा घेतला आहे. दरम्यान, ईझ माय ट्रीपने यापूर्वीही अशा प्रकारची राष्ट्रवादी भूमिका घेतल्याचे पाहायला मिळले होते.
काय आहे वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स?
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स ही एक नवीन स्वरूपाची टी-२० क्रिकेट स्पर्धा आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील निवृत्त दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. यात इंडिया चॅम्पियन्स, पाकिस्तान चॅम्पियन्स, इंग्लंड चॅम्पियन्स आणि इतर संघांचा समावेश आहे.