Indian Kabaddi Team No Handshake Video Viral: पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. त्यानंतर यूएन सारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर पाकिस्तानला उघडे पाडले. खेळाच्या मैदानातही भारताने पाकिस्तानला जागा दाखवली. आधी आशिया क्रिकेट स्पर्धा आणि त्यानंतर महिलांच्या क्रिकेट सामन्यात पाकिस्तानला पराभवाची धुळ चारली गेली. तसेच भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. त्याची पुनरावृत्ती आता भारताच्या युवा कबड्डी संघानेही केली आहे.
तिसऱ्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत भारताच्या तरूण कबड्डी संघाने आपल्या कामगिरीने पाकिस्तानला नमवलेच. शिवाय पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलनही टाळले. पाकिस्तानी संघाचा ८१-२६ असा दणदणीत पराभव केला. तत्पूर्वी नाणेफेकीदरम्यान कबड्डी संघाचा कर्णधार इशांत राठीने पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन करणे टाळले.
आशियाई युवा क्रीडा स्पर्धा १९ ऑक्टोबर रोजी बहरीनमध्ये सुरू झाली होती. सामन्यापूर्वी हस्तांदोलन टाळण्याची नाट्यमय घटना घडल्यानंतरही भारतीय कबड्डी संघाने कोर्टवरही आपले वर्चस्व गाजवले. भारताने स्पर्धेच्या पहिल्या दिवशी बांगलादेशचा ८३-१९ आणि दुसऱ्या दिवशी श्रीलंकेचा ८९-१६ ने पराभव करून स्वतःला सिद्ध केले.
पाहा व्हिडीओ –
हस्तांदोलन वादाची सुरुवात
सप्टेंबरमध्ये झालेल्या आशियाई क्रिकटे स्पर्धेत पहिल्यांदा हस्तांदोलनाचा वाद समोर आला. ७ सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवताच संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि शुभम दुबे हे पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच ड्रेसिंग रुमच्या दिशेने निघून गेले. तिथे गेल्यानंतर ड्रेसिंग रुमचा दरवाजा बंद करून घेण्यात आला. याचीच पुनरावृत्ती त्यानंतरच्या दोन सामन्यातही झाली.
यानंतर महिला विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघानेही पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन टाळले.
आशियाई युवा क्रीडा स्पर्धेतील कबड्डी
आशियाई युवा क्रीडा स्पर्धा दर चार वर्षांनी आयोजित केली जाते. कबड्डीचा यंदा या स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. यंदाच्या स्पर्धेत २३ ऑक्टोबर रोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे. एकूण सात संघ यात सहभागी झाले आहेत. प्रत्येक संघाचे सहा सामने होतील. भारत सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.