दक्षिण आफ्रिकेचा धावपटू ऑस्कर पिस्टोरियसच्या कृत्यावर कुणाचाही विश्वास बसलेला नाही. आपली प्रेयसी रिव्हा स्टीनकॅम्प हिचा गोळ्या घालून खून केल्याबद्दल त्याला गुरुवारी पोलिसांनी अटक केली. इटलीतील जेमोना या छोटय़ाशा गावात पिस्टोरियसने लंडन ऑलिम्पिकसाठी सज्ज होण्याकरिता सराव केला, तेथील गावकऱ्यांना पिस्टोरियसबाबतची ही बातमी ऐकून धक्काच बसला आहे.
जेमोनाच्या महापौर पावलो उर्बनी म्हणतात, ‘‘या बातमीने वैयक्तिकदृष्टय़ा मीच नव्हे तर संपूर्ण जेमोनावासीय हादरले आहेत. आपल्या क्रीडाविषयक धोरणांनी जेमोनाला पुढे नेण्याच्या प्रकल्पात पिस्टोरियसचा मोलाचा सहभाग होता. खेळाडू आणि माणूस म्हणूनही तो चांगला होता. आता या प्रकरणात सत्य ऐकण्यासाठी आम्ही आतूर आहोत.’’ आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आणि आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीने मात्र या प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला आहे. ‘‘या गंभीर प्रकरणावर आताच काही बोलणे उचित ठरणार नाही. रिव्हाच्या कुटुंबियांच्या शोकात आम्ही सामील आहोत,’’ असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने पत्रकाद्वारे म्हटले आहे.