जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला नोव्हाक जोकोव्हिच तर महिलांमध्ये अग्रमानांकित व्हिक्टोरिया अझारेन्काने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत विजयी सलामी नोंदवली.
जोकोव्हिचने बेल्जियमच्या डेव्हिड गॉफिनवर ७-६ (७-५), ६-४, ७-५ अशी मात केली आणि दुसरी फेरी गाठली. जोकोव्हिचने पहिला सेट टाय-ब्रेकरमध्ये जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये २-१ अशी आघाडीही त्याने मिळवली. मात्र गॉफिनने ४-४ अशी बरोबरी केली. यानंतर लौकिकाला साजेसा खेळ करत जोकोव्हिचने दमदार खेळ करत दुसरा सेटही जिंकला. तिसऱ्या सेटच्या अकराव्या गेममध्ये गॉफिनची सव्र्हिस भेदत जोकोव्हिचने तिसऱ्या सेटसह सामन्यावर कब्जा केला. ऑस्ट्रेलियन, अमेरिकन आणि विम्बल्डन स्पर्धेच्या जेतेपदांवर कब्जा करणाऱ्या जोकोव्हिचला कारकीर्दीत अद्याप फ्रेंच खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावता आलेले नाही. कारकीर्दीत ग्रँड स्लॅम विजयांचे वर्तुळ पूर्ण करण्याची जोकोव्हिचला संधी असून, या विजयाद्वारे त्याने सकारात्मक सुरुवात केली आहे. अन्य लढतींमध्ये फ्रान्सच्या जो विलफ्रेड त्सोंगाने फिनलँडच्या जार्को निइमिनेनवर ७-६ (६), ६-४, ६-३ अशी मात केली आणि तिसऱ्या फेरीत आगेकूच केली. स्पेनच्या डेव्हिड फेररने अल्बर्ट माँन्टेनेसचा ६-२, ६-१, ६-३ असा पराभव करत तिसरी फेरी गाठली.
व्हिक्टोरिया अझारेन्काने रशियाच्या एलेना वेस्निनाचा ६-१, ६-४ असा धुव्वा उडवला. दुसऱ्या फेरीत अझारेन्काची लढत अनिका बेकशी होणार आहे. पेट्रा क्विटोव्हाने अरावेन रेझाईवर ६-३, ४-६, ६-२ अशी मात केली. अॅग्निझेस्का रडवानस्काने मालरेय बुरडेटेचा ६-३, ६-२ असा पराभव केला.
संग्रहित लेख, दिनांक 29th May 2013 रोजी प्रकाशित
अझारेन्का, जोकोव्हिचची विजयी सलामी
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला नोव्हाक जोकोव्हिच तर महिलांमध्ये अग्रमानांकित व्हिक्टोरिया अझारेन्काने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत विजयी सलामी नोंदवली.
First published on: 29-05-2013 at 09:28 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Novak djokovic gets good workout in 1st french open match