इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सन लॉर्ड्समध्ये पदार्पण केल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. न्यूझीलंडविरुद्ध रॉबिन्सनने पहिल्या डावात चांगली गोलंदाजी करत ७५ धावांत चार गडी बाद केले. मात्र, रॉबिन्सनच्या गोलंदाजीऐवजी त्याने ८ वर्षापुर्वी केले ट्वीट जास्त चर्चेत आहे. रॉबिन्सनने २०१२-१३ मध्ये वर्णद्वेषी आणि लैंगिकतेबाबत आक्षेपार्ह ट्वीट केले होते. त्यामुळे त्याचावर सर्वत्र टीका होत आहे. दुसर्‍या कसोटीत रॉबिनसनला वगळले जाऊ शकते. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) या विषयावर अत्यंत संवेदनशील आहे आणि रॉबिन्सनवर कडक कारवाई करणार आहे.

‘द टेलिग्राफ’ने दिलेल्या वृत्तानुसार, बोर्डाने  रॉबिन्सनच्या वर्तनाचा तपास सुरू केला आहे. रॉबिन्सनला भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून देखील वगळले जाऊ शकते. रॉबिनसन यांनी आपल्या जुन्या ट्विटमध्ये आक्षेपार्ह  शब्दांचा वापर करून विशिष्ट धर्मातील लोकांच्या दहशतवादाशी संबंध जोडला होता. इतकेच नाही तर त्याने आशियाई वंशाच्या महिलांवरही अपमानास्पद भाष्य केले होते. लॉर्ड्समध्ये पदार्पण होताच त्याचे जुने ट्विट व्हायरल झाले. त्यानंतर रॉबिनसनने ड्रेसिंग रूममध्ये सहकारी खेळाडूंसमोर माफी मागितली.

वेगवान गोलंदाज रॉबिन्सनचा आक्षेपार्ह ट्विटनंतर माफीनामा!

रॉबिन्सनने वंशविद्वेष आणि लैंगिकतेबद्दलच्या जुन्या ट्विटबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. 27 वर्षीय रॉबिन्सन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “माझ्या कारकीर्दीतील सर्वात मोठ्या दिवशी आठ वर्षांपूर्वी केलेल्या ट्विटची मला लाज वाटते. ते ट्विट आज सार्वजनिक झाले आहे. मला हे स्पष्ट करायचे आहे की मी वर्णद्वेषी किंवा लिंगभेदाचा समर्थक नाही.”

रॉबिन्सन म्हणाला, “माझ्या कृतीबद्दल मला मनापासून खेद वाटतो आणि अशा टिप्पण्या केल्यामुळे मला लाज वाटते. त्यावेळी मी विचारहीन आणि बेजबाबदार होतो. तेव्हा माझी मनःस्थिती कशीही असेल पण ते माफीयोग्य नव्हती. मात्र मी आता विचारांनी परिपक्व झालो आहे.”