नवी दिल्ली : अशा पद्धतीने यंदाच्या हंगामाची अखेर होईल अशी अपेक्षा नव्हती, अशी खंत व्यक्त करत भारताचा माजी जगज्जेता आणि ऑलिम्पिक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने नव्या हंगामात नव्या उमेदीने परतण्याचे आश्वासन दिले.

ऑलिम्पिकपाठोपाठ जागतिक स्पर्धेतही विजेतेपद टिकविण्यात अपयश आल्याचे नीरजला अधिक वाईट वाटत आहे. गेली काही वर्षे नीरजला पाठदुखीने बेजार केले आहे. उपचार, विश्रांती घेतल्यानंतरही नीरज अद्याप शंभर टक्के तंदुरुस्ती दाखवू शकलेला नाही. पाठीच्या दुखापतीने सातत्याने त्याच्या कामगिरीवर परिणाम होत आहे. पण, नीरज अपयशाला तंदुरुस्तीचे कारण देण्यास तयार नाही.‘‘किमान जागतिक स्पर्धेची अखेर अशी होईल ही अपेक्षा नव्हती. सर्व आव्हानांना न जुमानता मला भारतासाठी सर्वोत्तम द्यायचे होते. पण, ते देता आले नाही. ती रात्र माझी नव्हती,’’ इतकेच नीरजने आपल्या अपयशाविषयी ‘एक्स’वरून लिहिले आहे.

‘‘भारतीय चाहत्यांनी मला कायमच प्रोत्साहन दिले. माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. अपयशातही त्यांचा पाठिंबा कणभरही कमी झाला नाही. यामुळे मला अधिक मजबूत हेण्याची उमेद मिळाली. तुमच्या सर्वांचे आभार मानून नव्या उमेदीने परत येईन असे आश्वासन देतो,’’ असेही नीरजने शेवटी म्हटले आहे.