ऑलिम्पिक पात्रता हॉकी स्पर्धा : – जागतिक हॉकी क्रमवारीत खालच्या क्रमांकावर असलेल्या रशियाविरुद्ध भारतीय संघ दोन ऑलिम्पिक पात्रता हॉकी सामन्यांपैकी पहिला सामना शुक्रवारी खेळणार आहे. या सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात आहे. जागतिक क्रमवारीत रशियाचा संघ २२व्या स्थानावर आहे, तर भारतीय संघ पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळे मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघापुढे टोक्यो ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित करण्याची ही सुवर्णसंधी असणार आहे.

एखाद्या दिवशी संघाची कामगिरी वाईट झाली, तर भारताचे ऑलिम्पिकचे स्वप्न उद्ध्वस्त होऊ शकते, याची प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांना पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस भारतीय पुरुष संघाची प्रमुख लढाई ही आत्मसंतुष्टतेशी आहे, असे रीड यांनी स्पष्ट केले आहे.

रीड यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षभरात भारताच्या बचाव क्षमतेत कमालीची सुधारणा झाली आहे. सुरेंदर कुमार आणि कनिष्ठ विश्वविजेत्या संघाचा सदस्य हरमनप्रीत सिंग यांचे या भक्कम बचावात महत्त्वाचे योगदान आहे. ड्रॅग-फ्लिकर रुपिंदरपाल सिंग आणि वीरेंद्र लाक्रा यांच्या पुनरागमनामुळे भारताचा संघ आणखी मजबूत झाला आहे. २०१८च्या आशियाई क्रीडा स्पर्धेमधील भारताच्या खराब कामगिरीनंतर संघातून वगळण्यात आलेल्या रुपिंदरला नंतर दुखापतींचा सामना करावा लागला. परंतु कारकीर्दीला पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी तो उत्सुक आहे. सराव सत्रात खांद्याला दुखापत झाल्यामुळे वरुण कुमारला माघार घ्यावी लागली. त्यामुळे अनुभवी लाक्राला संघात स्थान मिळाले.

भारताच्या मध्यरक्षणाची जबाबदारी मनप्रीत, हार्दिक सिंग, नियकांता शर्मा आणि विवेक सागर प्रसाद यांच्यावर आहे, तर आक्रमणाची धुरा मनदीप सिंग, आकाशदीप सिंग, एस. व्ही. सुनील, रमणदीप सिंग, ललित कुमार उपाध्याय आणि सिमरनजीत सिंग यांच्यावर आहे. याचप्रमाणे अनुभवी पी. आर. श्रीजेश आणि कृष्णन बहादूर पाठक यांच्यामुळे भारताचे गोलजाळे सुरक्षित आहे.

कलिंगा स्टेडियम ‘हाऊसफुल’ : शुक्रवारी होणाऱ्या भारताच्या पुरुष आणि महिला संघांच्या दोन सामन्यांसाठी कलिंगा स्टेडियम ‘हाऊसफुल’ झाले आहे. १६ हजार प्रेक्षकसंख्येच्या या स्टेडियममधील प्रेक्षकांचे पाठबळ भारतासाठी महत्त्वाचे ठरेल.

महिलांना अमेरिकेचे खडतर आव्हान

भारतीय महिला संघाला ऑलिम्पिक पात्रता हॉकी सामन्यांसाठी अमेरिकेच्या खडतर आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे टोक्यो ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित करण्यासाठी महिला संघाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.

जागतिक क्रमवारीत भारतीय महिला संघ नवव्या स्थानावर आहे, तर अमेरिकेचा संघ १३व्या स्थानावर आहे. परंतु उभय संघांमधील आंतरराष्ट्रीय कामगिरीचा आढावा घेतल्यास अमेरिकेने २२ आणि भारताने फक्त चार सामने जिंकले आहेत. परंतु व्यावसायिक खेळांमध्ये ही आकडेवारी मोडीत काढण्याची क्षमता राणी रामपालच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघापुढे आहे. राणी, ड्रॅग-फ्लिकर गुर्जित कौर, युवा आक्रमक लालरेमसियामी आणि गोलरक्षक सविता यांच्या कामगिरीवर भारताच्या यशाचे समीकरण अवलंबून असेल.

‘‘संपूर्ण वर्षभर या दोन सामन्यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. हे सामने मायदेशात खेळायचे की परदेशात याविषयी आम्हाला खात्री नव्हती. पण ऑलिम्पिक पात्रतेच्या दृष्टीने तयारी झाली असून, अमेरिकेशी सामना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत,’’ असा निर्धार भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक शोर्ड मरिन यांनी व्यक्त केला.

‘‘आशियाई क्रीडा स्पर्धेद्वारे ऑलिम्पिक पात्रतेचे पहिले लक्ष्य आम्ही निश्चित केले होते. परंतु दुर्दैवाने आम्ही अपयशी ठरलो. त्यामुळे आता या दोन सामन्यांवर पूर्णत: लक्ष केंद्रित केले आहे. मायदेशात सामने असल्यामुळे आमच्यावर कोणतेही दडपण नाही,’’ असे राणीने सामन्याच्या पूर्वसंध्येला सांगितले.

पुरुषांचा सामना

  • भारत वि. रशिया
  • सामन्याची वेळ : रात्री ८ वा.

महिलांचा सामना

  • भारत वि. अमेरिका
  • सामन्याची वेळ : सायंकाळी ६ वा.
  •  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, एचडी १