पीटीआय, इस्तंबूल (तुर्की)

बीजिंग २००८ पासून टोक्यो येथे झालेल्या गेल्या ऑलिम्पिकपर्यंत कायम असलेली कुस्तीमधील ऑलिम्पिक पदकाची प्रतिष्ठा जपण्यासाठी भारतीय मल्ल आज, गुरुवारपासून सुरू होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठीच्या अखेरच्या पात्रता फेरीत आपले कौशल्य पणाला लावतील.

पॅरिस ऑलिम्पिकसाठी आतापर्यंत भारताला केवळ चार कोटा मिळाले असून, चारही कोटा महिला कुस्तीगिरांनी मिळवले आहेत. फ्री-स्टाईल आणि ग्रिको-रोमन प्रकारात अद्याप एकही पुरुष मल्ल ऑलिम्पिक प्रवेश निश्चित करू शकलेला नाही. ऑलिम्पिकचे तिकीट पक्के करण्यासाठी आता अखेरची संधी भारतीय पुरुष मल्लांना आजपासून सुरू होणाऱ्या जागतिक पात्रता स्पर्धेतून मिळणार आहे. भारतीय पुरुष मल्लांना सहापैकी केवळ दोन वजनी गटात सर्वोत्तम संधी असल्याचे मानले जात आहे. अमन सेहरावत (५७ किलो) आणि ऑलिम्पिकपटू दीपक पुनिया (८६ किलो) हे या शर्यतीत आघाडीवर असतील. दीपक आणि सुजित कलकल यांना गेल्या महिन्यात झालेल्या आशियाई पात्रता स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली नव्हती. दुबईतील वादळी पावसामुळे दोघांनाही स्पर्धा केंद्रावर पोहचण्यास उशीर झाल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आले होते.

हेही वाचा >>>SRH vs LSG : नितीश कुमार रेड्डीने सीमारेषवर अप्रतिम झेल पकडत चाहत्यांना केले आश्चर्यचकित, पाहा VIDEO

आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राबल्य असलेल्या देशांनी यापूर्वीच ऑलिम्पिक पात्रता सिद्ध केली आहे. त्यामुळे ते या स्पर्धेत खेळणार नाहीत. भारतीय मल्लांना ही सुवर्णसंधी असली, तरी रशियातील मल्ल अन्य देशांकडून खेळत असल्यामुळे त्यांचे आव्हान भारतीय मल्लांसमोर असेल. ग्रिको-रोमन लढतींनी स्पर्धेला सुरुवात होईल. त्यानंतर महिला आणि अखेरीस फ्री-स्टाईल लढती होतील. भारतीय कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधातील उठावामुळे जवळपास दीड वर्ष भारतीय मल्ल सरावाविना खेळत आहेत आणि त्याचाच फटका त्यांना आतापर्यंत बसला आहे.

भारताकडून जयदीप (७४ किलो), दीपक (९७ किलो), सुमित मलिक (१२५ किलो) या अन्य मल्लांचा या स्पर्धेत समावेश आहे. महिला गटात मानसी अहलावत (६२ किलो) आणि निशा दहिया (६८ किलो) या दोघीच खेळणार आहेत. या अखेरच्या पात्रता स्पर्धेत प्रत्येक वजनी गटातून तीन मल्लांना ऑलिम्पिकचे तिकीट मिळणार आहे.