सूर्याची किरणे, सोन्याची लकाकी आणि गुणवत्ता कधीही लपून राहत नाही, ती नक्कीच कधी ना कधी तरी दृष्टीस पडते. उशिरा का होईना, पण जेव्हा तो योग येतो तेव्हा तो दुग्धशर्करेसारखाच असतो. गुणवत्तेवर विश्वास असला तरी खेळपट्टी आणि प्रतिस्पर्धी कुणीही असो, ओतप्रोत आत्मविश्वास असेल तर कसलीच तमा बाळगली जात नाही. स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरीच्या जोरावर मुंबईकर अजिंक्य रहाणेने भारतीय संघात स्थान मिळवले खरे, पण अजूनपर्यंत त्याला ठोस असे काहीच करता आले नव्हते. पण बेसिन रिझव्र्हच्या गोलंदाजांसाठी पोषक खेळपट्टीवर अजिंक्यने पहिले शतक झळकावले आणि भारतीयांच्या ओठांवर अजिं(क्य) म्या विजय पाहिला.., या ओळी आल्यावाचून राहिल्या नसतील. अजिंक्यच्या दमदार शतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ४३८ धावांपर्यंत मजल मारली. न्यूझीलंडची दुसऱ्या डावात १ बाद २४ अशी अवस्था असून ते अजूनही २२२ धावांनी पिछाडीवर आहेत.
सलामीवीर शिखर धवन आणि इशांत शर्मा (२६) यांनी दुसऱ्या दिवसाची आश्वासक सुरुवात केली. पहिली काही षटके चांगल्या पद्धतीने खेळून काढत त्यांनी न्यूझीलंडच्या नाकी नऊ आणले होते. पण ठरावीक फरकाच्या अंतराने भारताने फलंदाज गमावले आणि २ बाद १४१ वरून त्यांची ६ बाद २२८ अशी स्थिती झाली. धवनने यावेळी सुरेख फलंदाजीचा नमुना पेश केला असला तरी त्याचे शतक अवघ्या दोन धावांनी हुकले, त्याने १४ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ९८ धावांची खेळी साकारत भारतीय धावसंख्येचा मजबूत पाया रचला. या पायाचा उपयोग विराट कोहली (३८) आणि रोहित शर्मा यांना करता आला नाही. आपल्या तिसऱ्याच चेंडूवर एकही धाव गाठीशी नसताना रोहितने अवसानघातकी फटका खेळत आत्मघात करून घेतला. हे सारे प्रताप एका बाजूने अजिंक्य एका बाजूने पाहतच होता, पण संयम ठेवण्यावाचून त्याच्या हाती काहीच नव्हते. पण धोनीची त्याला चांगली साथ मिळाली आणि या दोघांनी भारताला ३०० धावांचा पल्ला गाठून दिला आणि लगेगच अजिंक्यने ९३ चेंडूत अर्धशतकही पूर्ण केले. चहापानानंतर तर या दोघांनी जलदगतीने धावा जमवायला सुरुवात केली. चहापानानंतर ही जोडी आता मोठी धावसंख्या उभारेल असे वाटत असतानाच बोल्टने ९३ व्या षटकांत ही जोडी संपुष्टात आणली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी १२० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. धोनीनंतर अजिंक्यचे शतक होणार की नाही, ही संदिग्धता साऱ्यांच्या मनात होती. पण अखेर एक मुंबईकरच दुसऱ्या मुंबईकराच्या मदतीला धावून आला. झहीरने (२२) अजिंक्यला सुरेख साथ दिल्याने अजिंक्यला कारकिर्दीतील पहिले शतक झळकावता आले. यापूर्वी दरबानमध्ये अजिंक्यचे शतक चार धावांनी हुकले होते. ९९ धावांवर असताना १०० व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अजिंक्यने अँडरसनच्या आखूड टप्प्याच्या चेंडूला ‘मिड विकेट’वरून चौकार वसूल करत पहिले शतक झळकावले. भारताकडून तो शतक झळकावणारा ७९ वा, तर मुंबईचा २२ वा क्रिकेटपटू ठरला आहे. शतक झाल्यावर अजिंक्यचा आत्मविश्वास उंचावलेला होता, पण साऊदीच्या चेंडूवर मारलेला जोरकस फटका बोल्टच्या हातात विसावला आणि अजिंक्यची अप्रतिम शतकी खेळी संपुष्टात आली. अजिंक्यने १७ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ११८ धावांची खेळी साकारली व त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताला पहिल्या डावात ४३८ धावांचा डोंगर उभारता
आला.
न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. झहीरने आपल्या पहिल्याच षटकात सलामीवीर पीटर फुल्टनला (१) माघारी धाडले. त्यानंतर न्यूझीलंडने एकही बळी गमावला नसून दुसऱ्या दिवसअखेर त्यांची १ बाद २४ अशी अवस्था आहे.
राहुल द्रविड माझा आदर्श आहे. लहानपणापासून त्याचा खेळ मी पाहत आलो आहे. भारतीय संघ तसेच राजस्थान रॉयल्सतर्फे खेळताना मला त्याच्याबरोबर खेळण्याची संधी मिळाली. मैदानात आणि मैदानाबाहेर मी त्याच्याकडून खूप काही शिकलो आहे. त्यामुळे राहुलचे मनापासून आभार. सचिन तेंडुलकरचे आभार मानायचे आहेत. शेवटच्या दोन कसोटीत त्यांनी मला माझ्या फलंदाजीबाबत सांगितले. ते म्हणाले, मी तुझ्या फलंदाजीचे निरीक्षण करत आहे, तुझी मेहनत आणि तंदुरुस्ती याकडेही माझे लक्ष आहे. संयम बाळग आणि संधीची प्रतीक्षा कर. त्यांचेही मनापासून आभार. – अजिंक्य रहाणे
धावफलक
न्यूझीलंड (पहिला डाव) : १९२
भारत (पहिला डाव) : शिखर धवन झे. वाल्टिंग गो. साऊदी ९८, मुरली विजय झे. वॉल्टिंग गो. साऊदी २, चेतेश्वर पुजारा पायचीत गो. बोल्ट १९, इशांत शर्मा झे. वॉल्टिंग गो. बोल्ट २६, विराट कोहली झे. रदरफोर्ड गो. व्ॉगनर ३८, अजिंक्य रहाणे झे. बोल्ट गो. साऊदी ११८, महेंद्रसिंग धोनी झे. वॉल्टिंग गो. बोल्ट ६८, रवींद्र जडेजा झे. फुल्टन गो. व्ॉगनर २६, झहीर खान झे. वॉल्िंटग गो. व्ॉगनर २२, मोहम्मद शमी नाबाद ०, अवांतर २१ (बाइज ८, लेग बाइज ४, वाइड ७, नो बॉल २), एकूण १०२.४ षटकांत सर्व बाद ४३८.
बाद क्रम : १-२, २/८९, ३-१४१, ४-१६२, ५-१६५, ६-२२८, ७-३४८, ८-३८५, ९-४२३, १०-४३८.
गोलंदाजी : ट्रेंट बोल्ट २६-७-९९-३, टीम साऊदी २०-०-९३-३, नील व्ॉगनर २२.४-३-१०६-३, कोरे अँडरसन १६-२-६६-०, जिमी नीशाम १८-२-६२-१.
न्यूझीलंड (दुसरा डाव) : पीटर फुल्टन पायचीत गो. झहीर १, हमिश रदरफोर्ड खेळत आहे १८, केन विल्यमसन खेळत आहे ४, अवांतर १ (नोबॉल १), एकूण ९ षटकांत १
बाद २४.
बाद क्रम : १-१.
गोलंदाजी : इशांत शर्मा ३-०-९-०, झहीर खान ३-२-७-१, मोहम्मद शमी ३-०-८-०.
संग्रहित लेख, दिनांक 16th Feb 2014 रोजी प्रकाशित
अजिं(क्य) म्या विजय पाहिला..
सूर्याची किरणे, सोन्याची लकाकी आणि गुणवत्ता कधीही लपून राहत नाही, ती नक्कीच कधी ना कधी तरी दृष्टीस पडते. उशिरा का होईना, पण जेव्हा तो योग येतो तेव्हा तो दुग्धशर्करेसारखाच असतो.
First published on: 16-02-2014 at 04:23 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On up rahane anchors india to big lead