ICC Womens Cricket World Cup 2025 India Beat South Africa by 52 Runs : भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी एकदिवसीय महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ५२ धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. दिड महिन्यांपासून चालू असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (२ नोव्हेंबर) नवी मुंबईतील डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २९८ धावांचा डोंगर उभा केला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला केवळ २४६ धावाच जमवता आल्या. या विजयानंतर भारतीय महिला संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

भारतीय महिला संघाने विश्वविजेतेपद पटकावल्याने देशात महिलांच्या क्रिकेटला अधिक प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. १९८३ साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या पुरूष क्रिकेट संघाने पहिल्यांदाच क्रिकेट विश्वचषक स्पर्धा जिंकली आणि त्यातून देशात क्रिकेटचा वेगाने प्रसार झाला. या खेळाला अधिक प्रोत्साहन मिळू लागलं. खेळाडूंकडे पैशांचा ओघ सुरू झाला. हीच गोष्ट भारतीय महिला क्रिकेट संघाच्या बाबतीत घडताना दिसू लागली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला क्रिकेटला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिलं आहे. आता चाहत्यांकडूनही महिला क्रिकेटला पसंती मिळू लागली आहे.

भारतीय क्रिकेटरसिकांची महिला क्रिकेटलाही पसंती

चाहत्यांकडून महिला क्रिकेटला मिळणाऱ्या पसंतीची, प्रोत्साहनाची पावती म्हणून एका क्रिकेट चाहत्याने समाजमाध्यमांवर दोन फोटो शेअर केले आहेत. २०१३ च्या महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील एक क्षण आणि २०२५ च्या महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील स्टेडियममधील एक क्षण त्याने समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. २०१३ च्या अंतिम सामन्यात स्टेडियम जवळपास रिकामं असल्याचं दिसतंय, तर २०२५ च्या अंतिम सामन्यात स्टेडियम खचाखच भरल्याचं काल पाहायला मिळालं.

भारतीय महिला क्रिकेट संघाचा चढता आलेख

२०१३ च्या महिला विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजवर ११४ धावांनी मात केली होती. या सामन्यावेळी स्टेडियम जवळपास रिकामं होतं. या स्पर्धेत भारतीय संघ ग्रुप स्टेजमधूनच स्पर्धेबाहेर फेकला गेला होता. या टप्प्यात भारतीय संघाने तीनपैकी दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करला होता. तर, केवळ एका सामन्यात भारतीय संघ विजय मिळवू शकला होता.

दरम्यान, २०१७ च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने जोरदार पुनरागमन केलं. भारतीय महिला संघाने इंग्लंड आणि वेल्स येथे खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली होती. मात्र, अंतिम सामन्यात इंग्लंडने भारतावर ९ धावांनी मात करत विश्वचषक उंचावला आणि भारतीय महिला संघाचं विश्वविजयाचं स्वप्न भंगलं. त्यानंतर आठ वर्षांनी भारतीय संघाने पुन्हा एकदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आणि अनेक वर्षांचं आपलं स्वप्न पूर्ण केलं.