PM Modi Congratulates Team India: भारतीय संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानवर ५ विकेट्सने दणदणीत विजय मिळवत ९ व्यांदा आशिया चषक जिंकला आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचे आगळेवेगळे अभिनंदन केले आहे. ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला जोरदार टोला लगावला आहे.

भारतीय क्रिकेट संघाने आशिया चषकात सलग तिसऱ्यांदा पाकिस्तानवर विजय मिळवत एक नवा विक्रम प्रस्थापित केला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट केली. “ऑपरेशन सिंदूर असो किंवा खेळाचे मैदान निकाल एकच…. तो म्हणजे भारताचा विजय”, असा टोला लगावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन व्यक्त केले.

आशिया चषकातील भारत-पाकिस्तान सामन्यावरून भारतात मोठा गजहब उडाला होता. पहलगामचा हल्ला, ऑपरेशन सिंदूर या पार्श्वभूमीवर पाकिस्तानबरोबर खेळणे योग्य नाही, अशी टीका विरोधकांकडून करण्यात आली. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह असल्यामुळे भाजपाला लक्ष्य करण्यात आले. सुरुवातीला एकदाच म्हणजे १४ सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान सामना होणार होता. मात्र २१ सप्टेंबर रोजी सुपर ४ मध्ये पाकिस्तानशी पुन्हा एकदा भारताचा सामना झाला. या सामन्यातही भारताने पाकिस्तानला पराभवाची धुळ चारली होती.

मात्र या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हरीस रौफने विमान पाडले असल्याचे जे हातवारे केले, त्यावरून भारतात नाराजी पसरली होती. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने हस्तांदोलन न करण्याचा निर्णय घेतल्याचे दुसऱ्या सामन्यावर पडसाद उमटले होते. या सर्वांचा परिणाम म्हणून भारत-पाकिस्तानचा अंतिम सामना अतिमहत्त्वाचा बनला होता.

भारताने असा जिंकला अंतिम सामना

पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत असताना भारतीय संघाला विजयासाठी १४७ धावांचे आव्हान दिले होते. पाकिस्तानच्या सलामीच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली होती. मात्र १० व्या षटकानंतर पत्त्यांच्या घराप्रमाणे पाकिस्तानचा डाव कोसळला. १४७ धावांचा पाठलाग करत असताना भारताने पॉवरप्लेमध्ये ३ मोठ्या विकेट्स गमावल्या. अभिषेक शर्मा ५ धावा करत, शुबमन गिल १२ धावा तर सूर्यकुमार यादव १ धावा करत बाद झाले.

यानंतर तिलक वर्माने संजू सॅमसनच्या साथीने भारताचा डाव सावरला. संजू सॅमसन २४ धावा करत बाद झाला. मात्र तिलकने यानंतर शिवम दुबेसह अर्धशतकी भागीदारी केली. तर शिवम दुबेने तिलक वर्माला चांगली साथ दिली आहे. तिलक-शिवमने ६० धावांची भागीदारी रचली, जी महत्त्वपूर्ण ठरली. शिवम दुबे कमालीचे मोठमोठे फठके खेळले. शिवमने २२ चेंडूत ३३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तिलक वर्मा भारताच्या विजयाचा हिरो ठरला. तिलकने ५३ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ६९ धावांची दिमाखदार खेळी केली.

रिंकू सिंहने अखेरच्या चेंडूवर विजयी चौकार लगावत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत एकही सामना न गमावता ही स्पर्धा जिंकली.