पॅरिस : फ्रान्स आणि पॅरिस सेंट-जर्मेनचा आघाडीपटू ओस्मान डेम्बेले फुटबॉलविश्वात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या बॅलन डी’ओर पुरस्काराचा यंदाचा मानकरी ठरला. त्याने बार्सिलोनाचे लामिन यमाल व राफिन्हा, पॅरिस संघातील सहकारी व्हिटिन्हा आणि लिव्हरपूलचा मोहम्मद सलाह यांसारख्या नामांकित खेळाडूंना मागे टाकत या पुरस्कारावर मोहोर उमटवली.
सेंट-जर्मेन संघाने गेल्या हंगामात क्लब फुटबॉलवर वर्चस्व गाजवले होते. त्यांनी मायदेशातील ‘लिग-१’, फ्रेंच चषक आणि ट्रॉफी डेस चॅम्पियन्स यासह क्लब फुटबॉलमधील सर्वांत लोकप्रिय चॅम्पियन्स लीगचे जेतेपद पटकावले. तसेच क्लब विश्वचषक स्पर्धेत सेंट-जर्मेनचा संघ उपविजेता ठरला. या यशात डेम्बेलेने निर्णायक भूमिका बजावली होती. त्याने आघाडीपटू म्हणून खेळताना सर्व स्पर्धांत मिळून ५३ सामन्यांत ३५ गोल आणि १६ गोलसाहाय्यांची (असिस्ट) नोंद केली. यासह चॅम्पियन्स लीगच्या एका हंगामात सेंट-जर्मेनसाठी सर्वाधिक गोलमध्ये (१४) योगदान देण्याचा किलियन एम्बापेचा विक्रमही डेम्बेलेने मोडीत काढला. त्यामुळेच त्याला बॅलन डी’ओर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बार्सिलोनाचा १८ वर्षीय आक्रमकपटू लामिन यमाल दुसऱ्या स्थानी आला. मात्र, त्याने सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्तम युवा (२१ वर्षांखालील) खेळाडूला मिळणारा कोपा पुरस्कार पटकावला. सेंट-जर्मेनला सर्वोत्तम संघ, तर या संघाच्याच लुइस एनरिके यांना सर्वोत्तम प्रशिक्षक म्हणून गौरविण्यात आले. गतहंगामात सेंट-जर्मेनकडून खेळलेला जियानलुइजी डोनारुमा सर्वोत्तम गोलरक्षकाच्या पुरस्काराचा मानकरी ठरला.
६ : बॅलन डी’ओर पुरस्कार जिंकणारा डेम्बेले हा फ्रान्सचा सहावा फुटबॉलपटू ठरला आहे. याआधी रेमंड कोपा, मिशेल प्लाटिनी (तीनदा), जीन-पिएर पापिन, झिनेदिन झिदान आणि करीम बेन्झिमा यांनी अशी कामगिरी केली होती.
बोनमतीची हॅट्ट्रिक
स्पेन आणि बार्सिलोनाची मध्यरक्षक एताना बोनमती सलग तिसऱ्यांदा महिलांमध्ये बॅलन डी’ओर पुरस्काराची मानकरी ठरली. बार्सिलोनाला चॅम्पियन्स लीग, तर स्पेनला युरो स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, या दोन्ही स्पर्धांत बोनमती सर्वोत्तम खेळाडू ठरली होती. त्यामुळे तिने स्पेन संघातील सहकारी मारिओना कालडेन्टेला मागे टाकत बॅलन डी’ओर पुरस्काराची हॅट्ट्रिक साजरी केली. विशेष म्हणजे, कालडेन्टेचा समावेश असलेल्या आर्सेनल संघानेच महिला चॅम्पियन्स लीगच्या अंतिम लढतीत बोनमतीच्या बार्सिलोना संघावर मात केली होती.
पुरस्काराचे महत्त्व…
फ्रान्स फुटबॉल मासिकातर्फे १९५६ सालापासून पुरुष गटात, तर २०१८ सालापासून महिला गटात बॅलन डी’ओर पुरस्कार दिला जात आहे. फुटबॉलविश्वातील हा सर्वांत प्रतिष्ठेचा वैयक्तिक पुरस्कार मानला जातो. लिओनेल मेसी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांनी मिळून १३ वेळा हा पुरस्कार जिंकला आहे. यंदा या दोघांना नामांकनही मिळाले नव्हते. ‘फिफा’च्या जागतिक क्रमवारीतील अव्वल १०० देशांतील निवडक पत्रकार (प्रत्येक देशाचा एक) या पुरस्कारासाठी मतदान करतात. त्यांच्या मतांच्या आधारे विजेता ठरतो.