तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा क्रिकेट संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला आहे. तब्बल १७ वर्षांनी दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिका होणार असून त्याआधीच इंग्लंडच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला गुरुवारपासून सुरूवात होणार असून, पाहुण्या संघाने यासाठी आपला अंतिम संघ देखील जाहीर केला होता. मात्र २४ तासांचा अवधी शिल्लक असतानाच, पाकिस्तानातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बीबीसीच्या अहवालात पाहुण्या इंग्लंड संघातील तब्बल १४ सदस्यांची तब्येत बिघडल्याने त्यांनी सरावातून माघार घेतल्याची माहिती देण्यात आलीये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोन्ही संघांमधील बहुप्रतिक्षित पहिल्या कसोटीपूर्वी, इंग्लंड संघातील डझनहून अधिक सदस्य व्हायरसमुळे आजारी पडले आहेत. आजारी सदस्यांमध्ये इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सचाही समावेश आहे. १७ वर्षांनंतर प्रथमच पाकिस्तानमध्ये दोन्ही संघांमधील कसोटी सामना सुरू होण्याची वाट पाहणाऱ्या लाखो चाहत्यांना ही बातमी मोठा धक्का म्हणून आली आहे.

दोन्ही संघांदरम्यान १ डिसेंबरपासून रावळपिंडी येथे पहिल्या कसोटीला सुरुवात होईल. मात्र, त्याचवेळी इंग्लंड संघातील खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफमधील काही सदस्यांना बरे वाटत नसल्याची माहिती इंग्लंड संघाच्या प्रवक्त्याने दिली आहे. याच कारणाने संघाचे अखेरचे सराव सत्र देखील रद्द केले गेले. या संपूर्ण प्रकरणावर डॉक्टर लक्ष ठेवत असून, लवकरच याबाबतची इतर माहिती देण्यात येईल.

अहवालानुसार, इंग्लंड संघाचा स्वतःचा शेफ आहे, परंतु हा संसर्ग अन्नाशी संबंधित नसल्याचे सांगितले जात आहे. हा कोरोना विषाणू नसल्याचंही बोललं जात आहे. इंग्लंडने पहिल्या कसोटीसाठी जाहीर केलेल्या त्यांच्या अंतिम अकरामध्ये प्रथमच अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोनचा कसोटी संघात समावेश केला आहे. लिव्हिंगस्टोन आता कसोटी पदार्पण करणार आहे. याशिवाय बेन डकेटचे ७ वर्षांनंतर कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. इंग्लिश कसोटी संघाने यापूर्वी २००५ मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता, तेव्हा त्यांचा ०-२ असा पराभव झाला होता.

हेही वाचा :   FICA: धक्कादायक! पैसा की देश, फिकाच्या रिपोर्टने क्रिकेटविश्वात उडवली खळबळ

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील तीन कसोटी सामने आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाचा भाग आहेत. पहिला सामना रावळपिंडी येथे १ ते ५ डिसेंबर, दुसरा सामना मुल्तान येथे ९ ते १३ डिसेंबर आणि शेवटचा सामना कराची येथे १७ ते २१ डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. इंग्लंडचे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील (WTC) मधील आव्हान संपुष्टात आले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pak vs eng as soon as they reached pakistan so many players of the england team fell ill know the reason avw
First published on: 30-11-2022 at 14:12 IST