पाकिस्तानच्या संघाने आशिया चषकातील युएईविरुद्धचा सामना खेळण्याचा निर्णय घेतला आहे. भारताविरुद्धच्या सामन्यानंतर पाकिस्तानने सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांची हकालपट्टी करण्याची मागणी आयसीसीकडे केली होती. आयसीसीने ही मागणी फेटाळली होती. या सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ स्टेडियमच्या दिशेने रवाना झाला नव्हता कारण पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू होत्या. अखेर हा सामना खेळण्याचा निर्णय घेण्यात आला. पाकिस्तानचा संघ मैदानाच्या दिशेने रवाना झाला आहे. पाकिस्तानच्या बहिष्कारामुळे सुपर फोर अर्थात बाद फेरीचं समीकरण पूर्णत: बदललं असतं. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार ८ ऐवजी ९ वाजता सुरू होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख मोहसीन नक्वी यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे.

एप्रिल महिन्यात जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांनी प्राण गमावले होते. भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्धस्त करत प्रत्युत्तर दिलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध दुरावले. आशिया चषकात हे दोन संघ एकमेकांविरुद्ध खेळणार का? याविषयी साशंकता होती. केंद्र सरकारने यासंदर्भात भूमिका जाहीर केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद तसंच आशियाई क्रिकेट परिषदेतर्फे आयोजित सामन्यांमध्ये भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध खेळेल. मात्र द्विराष्टीय मालिका होणार नाही. सोप्या भाषेत भारतीय संघ पाकिस्तानात मालिकेसाठी जाणार नाही. याच धर्तीवर पाकिस्तानचा संघ भारतात येणार नाही. केंद्र सरकारने हे धोरण स्पष्ट केल्यामुळे भारतीय संघ आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध खेळणार हे स्पष्ट झालं.

पाकिस्तान लढतीत भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली अघा यांनी नाणेफेकीच्या वेळेस हस्तांदोलन केलं नाही. सामना संपल्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन नाकारलं. या प्रकारामुळे नाराज होऊन पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली अघा पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहिला नाही. पत्रकार परिषदेला त्याच्याऐवजी प्रशिक्षक माईक हेसन उपस्थित होते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हे प्रकरण पुढे रेटत सामनाधिकाऱ्यांना लक्ष्य केलं. पायक्रॉफ्ट यांनी हस्तांदोलन करू नका अशी सूचना दिल्याचा आरोप पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केला. पायक्रॉफ्ट यांची तातडीने हकालपट्टी करावी अशी मागणी पीसीबीने केली होती. मागणी पूर्ण न झाल्यास उर्वरित सामन्यांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा पाकिस्तानने दिला.

हस्तांदोलन न करण्याचा मुद्दा पेटला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी याप्रकरणी सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांना लक्ष्य केलं. पायक्रॉफ्ट यांनीच कर्णधारांना हस्तांदोलन न करण्याची सूचना केली होती असा आरोप नक्वी यांनी केला. पायक्रॉफ्ट यांची तातडीने हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी आयसीसीकडे केली. मागण्या पूर्ण न झाल्यास पाकिस्तान युएईविरुद्धच्या लढतीवर बहिष्कार घालण्याचे संकेत दिले.

दरम्यान पाकिस्तानने आशिया चषकातून माघार घेतल्यास त्यांचं १.२० कोटी अमेरिकन डॉलर्सचं नुकसान होऊ शकतं. आशियाई क्रिकेट परिषदेच्या वार्षिक महसूलावरही पाणी सोडावं लागेल. आशियाई क्रिकेट परिषदेच्या वार्षिक महसुलातील ७५ टक्के हिस्सा (प्रत्येकी १५ टक्के) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान या कसोटी खेळणाऱ्या संघांना मिळतो.

पाकिस्तानच्या संघाने युएईच्या सामन्यासाठी सराव केला. मात्र सामन्याआधीची पत्रकार परिषद त्यांनी रद्द केली.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन मोहसीन नक्वी हेच आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख आहेत. रविवारच्या लढतीनंतर नक्वी यांनी पाकिस्तान सरकारमधील उच्च पदस्थांच्या बैठकी घेतल्या.