Pakistan beat South Africa by 93 Runs in 1st Test: आशिया चषकात भारताविरुद्ध तिन्ही लढतीत पराभवाला सामोरं जावं लागलेल्या पाकिस्तानने घरच्या मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जेत्या दक्षिण आफ्रिका संघाला नमवण्याची किमया केली. दक्षिण आफ्रिकेने जून महिन्यात झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये तुल्यबळ ऑस्ट्रेलियाला हरवत जेतेपदावर नाव कोरलं होतं. तेंबा बावूमाच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने सर्वांगीण खेळाच्या जोरावर क्रिकेटची पंढरी असणाऱ्या लॉर्ड्सवर ऐतिहासिक जेतेपदाची कमाई केली. २७ वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेचं आयसीसी जेतेपदाचं स्वप्न साकारलं होतं. पण आता दक्षिण आफ्रिका संघाला पाकिस्तानविरूद्ध लाहोर कसोटीत ९३ धावांनी पराभव पत्करावा लागला आहे.
पाकिस्तानचा संघ आयसीसी टेस्ट रेटिंगमध्ये सातव्या स्थानी आहे. त्यांच्या वनडे आणि टी२० संघाची कामगिरी यथातथाच झाली होती. मात्र टेस्ट संघाने दमदार सांघिक प्रदर्शन करत बाजी मारली. पाकिस्तानने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. पाकिस्तानतर्फे एकाही बॅट्समनला शतकी खेळी करता आली नाही. मात्र सलामीवीर इमाम उल हक आणि टी२० कर्णधार सलमान अली अघा यांनी प्रत्येकी ९३ धावांची खेळी केली. कर्णधार शान मसूदने ७६ धावांची संयमी खेळी केली. विकेटकीपर बॅट्समन मोहम्मद रिझवानने ७५ धावांची खेळी केली. पाकिस्तानने चार अर्धशतकांच्या बळावर ३७८ धावांची मजल मारली. दक्षिण आफ्रिकेतर्फे सेनूरन मुथुसामीने ६ विकेट्स पटकावल्या.
दक्षिण आफ्रिकेने प्रत्युत्तरादाखल खेळताना २६९ धावा केल्या. टोनी द झोरीने १० चौकार आणि २ षटकारांसह १०४ धावांची मॅरेथॉन खेळी केली. रायन रिकलटनने ७१ धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली. पाकिस्तानकडून ४०वर्षीय नोमन अलीने ६ विकेट्स घेत आफ्रिकेच्या डावाला खिंडार पाडलं. तापामुळे आलेल्या अशक्तपणाला बाजूला सारत साजिद खानने ३ विकेट्स घेतल्या. पाकिस्तानला १०९ धावांची आघाडी मिळाली.
दक्षिण आफ्रिकेच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर पाकिस्तानचा दुसऱ्या डावात १६७ धावांतच गडगडला. बाबर आझमने ४२ तर अब्दुला शफीकने ४१ धावा केल्या. सौद शकीलने ३८ धावा केल्या. सेनुरन मुथुसामीने ५ तर सिमोन हार्मेरने ४ विकेट्स घेतल्या. पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला २७७ धावांचं लक्ष्य दिलं.
कर्णधार आणि भरवशाचा बॅट्समन एडन मारक्रम तीन धावा करून तंबूत परतला. वियान मुल्डरला तर भोपळाही फोडता आला नाही. पहिल्या डावातील शतकवीर झोरी १६ धावांचंच योगदान देऊ शकला. धडाकेबाज फलंदाज ट्रिस्टन स्टब्स २ धावांवर बाद झाला. यानंतर डेवाल्ड ब्रेव्हिस आणि रायन रिकलटन यांनी पाचव्या विकेटसाठी ९८ चेंडूत ७३ धावांची भागीदारी केली. नोमन अलीने ब्रेव्हिसला बाद करत ही जोडी फोडली. ब्रेव्हिसने ६ चौकार आणि २ षटकारांसह ५४ धावा केल्या. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या रिकलटनला साजिद खानने बाद केलं. त्याने ४५ धावांची खेळी केली. साजिद खानने सेनुरन मुथुसामीला एलबीडब्ल्यू करत आफ्रिकेला आणखी अडचणीत टाकलं. त्याने ६ धावा केल्या. नोमान अली आणि साजिद खाननंतर खालच्या फळीला शाहीन आफ्रिदी झटपट माघारी धाडत ४ विकेट्स घेतल्या. यासह आफ्रिकेचा संघ १८३ धावांवर सर्वबाद झाला. पाकिस्तानकडून दुसऱ्या डावात नोमान अली आणि शाहीन आफ्रीदी यांनी प्रत्येकी ४-४ विकेट्स घेतल्या. तर साजिद खानने २ विकेट्स घेतल्या.
दुखापतीतून न सावरल्यामुळे तेंबा बावूमा या मालिकेत खेळू शकणार नाहीये. प्रमुख फिरकीपटू केशव महाराज हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून पूर्णपणे न सावरल्यामुळे पहिल्या कसोटीत खेळू शकला नाही. दुसरी कसोटी २० ऑक्टोबरपासून रावळपिंडी इथे सुरू होत आहे. आफ्रिकेचा संघ या दौऱ्यात २ टेस्ट, तीन टी२० आणि तीन वनडे खेळणार आहे.