दुबई : येत्या रविवारी भारत-पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या ‘अव्वल-१२’ फेरीमधील सामन्यात विराट कोहलीच्या संघाचे पारडे जड नसेल. पाकिस्तानला कमी लेखून चालणार नाही, असे मत भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले.

प्रेरक फक्त सल्ला देऊ शकतील. परंतु मैदानावरील खेळाडूंची कामगिरी विजयासाठी महत्त्वाची ठरते, अशी प्रतिक्रिया गावस्कर यांनी व्यक्त केली. आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी महेंद्रसिंह धोनीची भारतीय संघाचा प्रेरक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ‘‘ट्वेन्टी-२० हा वेगवान क्रिकेट प्रकार असल्यामुळे प्रेरकाच्या कार्याला मर्यादा येतील. रणनीतीबाबत प्रेरक सल्ला देऊ शकेल. पेय-विश्रांतीच्या काळात धोनी फलंदाज किंवा गोलंदाजांशी संवादही साधू शकेल. परंतु कामगिरी बजावण्याची जबाबदारी ही मात्र खेळाडूंवर असेल. खेळाडू दडपण कसे हाताळतील, यावर सामन्याचा निकाल अवलंबून असेल,’’ असे गावस्कर म्हणाले.

ट्वेन्टी-२० क्रिकेट प्रकाराचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे कोहलीवरील दडपण कमी असेल, असे गावस्कर यांनी सांगितले. ‘‘तुम्ही संघाचे नेतृत्व करता, तेव्हा फक्त वैयक्तिक कामगिरीचा विचार करून चालत नाही. कर्णधाराने धावांसाठी झगडणाऱ्या फलंदाजांशी आणि रणनीतीबाबत गोलंदाजांशी चर्चा करून पाठबळ द्यायला हवे,’’ असे गावस्कर यावेळी म्हणाले.